‘देशात सीरमला लस तयार करण्याचा परवाना देण्यात आला. लस ही गरज आहे त्यामुळे लसीचं उत्पादन वाढवणं सरकारचंही काम, सीरमचंही काम आहे. याआधी केंद्राला १५० रुपये, राज्याला आधी ४०० आणि नंतर ३०० रुपये तर खासगी हॉस्पीटलसाठी ७०० रूपये लस देण्याचे पुनावाला यांनी जाहीर केले. हा सगळे संशय निर्माण करणारे असून याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत. त्यांना कोण बदनाम करत’ नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
‘सुरुवातीला राज्याला ४०० रुपयांनी लस देणार असल्याचे सांगितले मग त्यांनी ३०० रुपये भाव स्वतः जाहीर केला. हे सगळं संशय निर्माण करणारे विषय आहेत. ज्यापध्दतीने ४०० रुपये किंमत ठरवतात आणि नंतर ट्वीट करुन ३०० रुपयाला द्यायला तयार आहे असे सांगितले. हा जो संशय निर्माण होतोय त्यामुळे देशातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले,’ असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
‘आपला देश अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलंही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपध्दत योग्य नाही,’ या शब्दांत नवाब मलिक यांनी पंतप्रधांवर टीका केली आहे.
‘निवडणूकांसाठी व भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. लसीचे उत्पादन आपल्याकडे कमी असताना इतर देशांना लस देण्यात आली, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, आता हे सगळं सोडून देशामध्ये जे करोनाचे संकट आहे. या आरोग्य आणीबाणीत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून करोनावर मात देता येईल असा कार्यक्रम तयार करावा,’ अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान, कोव्हिशील्ड लस पुरवण्याच्या मागणीवरून भारतातील काही शक्तिशाली व्यक्तींनी धमकावल्याचं विधान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी केले होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times