अमरावती: करोना संसर्गाची लागण झाल्यावर मिळेल त्या वाहनानं अहमदाबादवरुन त्यानं अमरावती गाठले. अमरावतीत आल्यानंतर उपचारांसाठी रुग्णालयात न जाता घरातच राहुन नोटांना थुंकी लावून तो रस्त्यावर फेकत होता. या धक्कादायक प्रकारानं परिसरात खळबळ माजली आहे. सदर प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना या बाबत माहिती दिली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी वैद्यकीय यंत्रणेच्या मदतीने विकृत युवकाला तत्काळ वलगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. त्यानंतर परिसरातील नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

शहरातील साईनगर परिसरातील एका २१ वर्षीय तरुण नोकरीसाठी गुजरातमधील अहमदाबादमध्ये केला होता. तिथं त्याला करोनाची लागण झाली. करोनाचा अहवाल येताच कोविड सेंटरमध्ये उपचार न घेता अहमदाबादमधून शहरात आला. शहरात करोनाचे उपचार घेण्याचे सोडून घरातच थांबला. सदर करोना पॉझिटीव्ह रुग्णांने चक्क नोटांना थुंकी लावून घराबाहेर फेकण्याचा प्रकार सुरु केला.

सदर युवकाने २७ एप्रिलला अहमदाबादमध्येच करोनाची चाचणी केली होती व त्याला करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड सेंटर किंवा त्याच ठिकाणी गृह विलगीकरणात राहणे आवश्यक असताना सुध्दा शेकडो किमीचे अंतर पार करुन शहरात दाखल झाला. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवरच आंतरराज्यीय तसेच आंतरजिल्हा वाहतूक बंद आहे. मात्र मालवाहू वाहतूक सुरू आहे. त्यामुळे तो अहमदाबादवरुन दोन ते तीन ठिकाणी मालवाहू ट्रक बदलत अमरावतीपर्यंत ट्रकनेच पोहोचला.

शनिवारी सकाळी तो साईनगर भागातील त्याच्या घरी गेला. या घरात कोणीही राहत नाही. दरम्यान, शनिवारी दुपारपासून त्याने थुंकी लावून दहा रुपयांच्या काही नोटा घराबाहेर फेकण्यास सुरूवात केली. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या युवकाच्या एका नातेवाइकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर या नातेवाईकांनीच या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं. तसंच, त्याची प्रकृतीसुद्धा ठिक नसल्याचं त्यांनी सांगितलं.

सदर घटनेचं गांभीर्य ओळखून रहिवाश्यांनी लगेचच पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीसांनी तत्काळ रुग्णवाहिका या रुग्णाच्या घरी पाठवली व त्याला रुग्णवाहिकेत बसवले, त्यावेळी हा रुग्ण स्वत:हून रुग्णवाहिकेस बसला. पोलीसांनी वैद्यकीय यंत्रणेच्या मदतीने विकृत युवकाला तत्काळ वलगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here