पुनावाला सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी ट्विट करून सीरमला मिळालेल्या एकूण लसीच्या कॉन्ट्रॅक्टची माहिती दिली आहे. ते म्हणतात की लस निर्मिती ही एक विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीच भरमसाठ लस निर्मिती करणे शक्य नाही. तसेच भारताची लोकसंख्या देखील अफाट आहे. त्यामुळे इतक्या प्रचंड प्रमाण लस तयार करणे सोप्प काम नाही असे त्यांनी स्पष्ट केलं. कमी लोकसंख्येचे विकसित देश आणि बड्या कंपन्यादेखील उत्पादन करताना संघर्ष करत असल्याचे पुनावाला यांनी म्हटलं आहे.
अदर पुनावाला पुढे असते म्हणतात की गेल्या वर्षी एप्रिलपासून आम्ही भारत सरकारसोबत काम करत आहोत. सरकारने आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
आजच्या घडीला सीरमला २६ कोटी डोसचे कंत्राट मिळाले आहे. त्यापैकी १५ कोटी लशींचा पुरवठा झाला आहे. यासाठी सरकारकडून आम्हाला १०० टक्के आगाऊ रक्कम म्हणून १७३२.५० कोटी रुपये मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यातून पुढील काही महिन्यात ११ कोटी डोस पुरवले जातील. आणखी ११ कोटी डोस दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारांना आणि खासगी हॉस्पिटल्सला दिले जाणार आहेत.
आज प्रत्येकाला लवकरात लवकर लस हवी आहे. आमचा ही तोच उद्देश आहे. मात्र त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सर्व भारतीयांनी एकत्रपणे कोव्हिडशी सामना केला पाहिजे अशी अपेक्षा पुनावाला यांनी केली आहे.
भारतातून लशींच्या मागणीसाठी धमक्यांचे फोन
भारतात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरु झाले आहे. मात्र देशात सध्या दोन कंपन्या करोना प्रतिबंधात्मक लस तयार करत आहेत. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम स्थगित करण्यात आली आहे.
कोव्हीशील्ड लसींची निर्मिती करणाऱ्या पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्युटवर सध्या प्रचंड ताण आहे. पुण्यात या लसींची निर्मिती होत आहे. मात्र त्या तुलनेत देशातून लसींना मोठी मागणी आहे. याबाबत अदर पुनावाला यांना भारतातून बड्या नेत्यांचे, मुख्यमंत्र्यांचे तसेच उद्योजकांकडून लसींच्या मागणीसाठी धमकी देणारे फोन येत असल्याचा दावा अदर पुनावाला यांनी नुकताच केला होता. त्यावरून राज्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times