मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याचा कायापालट करण्यात येणार आहे. हाजी अलीच्या विकासासाठी राज्य सरकारने ३५ कोटींची तरतूद केली असून दर्ग्याच्या सौंदर्यीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

राज्याचे बंदर विकास मंत्री आणि राज्याचे पालकमंत्री यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली. या बैठकीत दर्ग्याच्या नुतनीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या आराखड्याचे सादरी करण करण्यात आले. या आराखड्यानुसार हाजी अली दर्ग्याच्या मुख्य रस्त्यावर बुलंद दरवाजा उभारणे, विविध फुलांची झाडे असलेल्या मुघल गार्डनची निर्मिती करणे, तसेच या गार्डनमध्ये प्राचीन काळाची आठवण करून देणारे बाकडे आणि लाईटची व्यवस्था करणे, भाविकांसाठी व्हिजिटर प्लाझा उभारणे, मुख्य रस्ता ते दर्ग्यापर्यंतच्या रस्त्याचे सौंदर्यीकरण करणे आणि दर्ग्याच्या मुख्य दरवाजाचेही सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या कामासाठी तातडीने १० कोटी रुपये देण्याचं अर्थमंत्र्यांनीही मान्य केलं आहे. विशेष म्हणजे हाजी अली ज्यूस सेंटर ते मुख्य दरवाजा पर्यंत ३० हजार स्क्वेअर फुटावर मुघल गार्डन तयार करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनच्या धर्तीवरच हे गार्डन असणार आहे. अडीच वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं अस्लम शेख यांनी सांगितलं.

हाजी अलीला दररोज देश-विदेशातून हजारो भाविक येत असतात. त्यामुळे धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटन स्थळ म्हणूनही हाजी अलीला महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे या दर्ग्याचे आणि आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण होणं गरजेचं असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सौंदर्यीकरणासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने घेण्यात येणार असल्याचं अस्लम शेख यांनी सांगितलं. विशेष म्हणजे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच हा दर्गा असल्याने विकास कामासाठी परवानग्या पटकन मिळणं सोपं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, शेख यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सह पोलीस आयुक्त नवल बजाज, हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त मसूद हसम दादा, रिझवान मर्चंट, सुहेल खांडवानी आणि जाफर शेख आदी यावेळी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here