लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदीचा आदेश असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी कोविडची अँटीजेन टेस्ट करणे गरजेचे आहे. संशयित स्वप्निल बनसोडे हा सांगली-मिरज रोडवरील सिनर्जी हॉस्पीटलमध्ये आय.टी डिपार्टमेंटला काम करत असून तो लोकांचे स्वॅब न घेता त्यांना करोना चाचणीचे निगेटीव्ह रिपोर्ट देत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना मिळाली होती. त्यांनी प्रकरणाचे गंभीर्य ओळखून तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्या प्रमाणे एका ग्राहकच्या मोबाईलवरून स्वप्निल बनसोडेशी संपर्क साधला व माझ्या मित्राचे आपल्याकडे न येता कोव्हीडचे निगेटीव्ह रिपोर्ट लागणार असून त्या मोबदल्यात आपण किती पैसे घेता असे विचारले. त्यावेळी प्रत्येकी निगेटीव्ह रिपोर्ट मागे एक हजार रुपये घेतो. जर रिपोर्ट पाहिजे असल्यास आपण मोबाईलवर आधार कार्डचे फोटो व्हाट्सअॅपद्वारे पाठवा व मी सांगेल त्या ठिकाणी येवून रिपोर्ट घेवून जा, असे सांगितले.
स्वप्निलच्या सांगण्यानुसार त्याला आधार कार्डचे फोटो पाठविले. त्यांनतर मोबाईलवर कोव्हीड चाचणीचा मेसेज आल्यानंतर स्वप्निल बनसोडेला संपर्क केला असता त्याने नंतर या व रिपोर्ट घेवून जा असे सांगितले. सायंकाळी स्वप्निल बनसोडे याचा फोन आल्यानंतर पथकाने सिनर्जी हॉस्पिटल येथे जाऊन पाहिले असता खाली एक व्यक्ती हातात कागद घेऊन उभा असलेला दिसला. त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेवून हातातील कागद पाहता बनावट मयत व्यक्तीचे करोना चाचणीचे निगेटीव्ह रिपोर्ट होते. रिपोर्ट बाबत त्याच्याकडे चौकशी करता बनावट रिपोर्टचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून न्यायालयानं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून आणखी किती लोकांना बोगस रिपोर्ट दिले व यात रुग्णालयातील कोणी सहभागी आहे काय, याचा अधिक तपास करण्यात येणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times