म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबईत झपाट्याने वर गेलेला करोनाचा संसर्ग गेल्या दहा दिवसांपासून पुन्हा नियंत्रणात येऊ लागला आहे. यंदाच्या फेब्रुवारीपासूनची सर्वांत कमी म्हणजे २६६२ इतकी रुग्ण नोंद मंगळवारी नोंदवली गेली. लघु प्रतिबंधित क्षेत्रातील काटेकोर अंमलबजावणी, पोलिस आणि सोसायट्यांची मदत, नागरी सहभाग, निर्बंधांची कठोर मात्रा ही यामागची कारणे आहेत. परिणामी रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून १११ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांच्या घरात पोहोचले आहे.

मुंबईत फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण संख्या वाढीस लागली होती पाच, सात हजारांवरून थेट ११ हजारांपलीकडे रुग्णवाढ होत असल्याने चिंता होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येला पुन्हा उतार येऊ लागल्याने मुंबई पूर्वपदावर येऊ लागली आहे. मुंबई शहर व उपनगरातील रुग्ण दुपटीचा कालावधी एप्रिल अखेरीस ३० ते ३५ दिवस इतका होता. मात्र कठोर निर्बंधांनंतर रुग्ण संख्या घटू लागल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वेगाने वाढू लागला आहे.

करोनाचा संसर्ग चाळी आणि झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींमध्ये वेगाने फैलावतो आहे. त्यामुळे राज्य सरकारने करोनाविषयक उपाययोजनांमध्ये नव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये इमारतींवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. नवीन निर्बंधांमध्ये एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती इमारत ‘मिनी कण्टेन्मेंट’ झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे. तसा फलक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लावला जात असून बाहेरच्या नागरिकांना इमारतीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सोसायटीतील नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडता येत आहे. करोना रोखण्यासाठी ही मात्रा सर्वांत प्रभावी असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

अशी सुधारली मुंबईची प्रकृती

लघु प्रतिबंधित क्षेत्र

पाच रुग्ण आढळले की संपूर्ण इमारत सील केली जाते. एखाद्या मजल्यावर एक रुग्ण सापडला तरी आजूबाजूच्या घरांतील सर्वांच्या चाचण्या केल्या जात आहेत. मजला सॅनिटायझ केला जातो. परिणामी संसर्ग वाढत नाही. घरात विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय पथकांची प्रत्यक्ष भेट किंवा दूरध्वनीवरून संवाद.

पोलिसांची मदत

प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पोलिस, बिटमार्शलना नजर ठेवणे बंधनकारक केले आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्यास पोलिसांचा पहारा ठेवला जातो. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू दिले नाही. पोलिस मित्र म्हणून नेमलेल्या नागरिकांचा वापर उपयुक्त ठरला आहे.

नागरिकांचा सहभाग

असंख्य सोसायट्यांनी पालिकेला चांगले सहकार्य केले आहे. सोसायटी पदाधिकारी स्वतःहून नवीन रुग्णांची माहिती पालिकेला देत आहेत. बाहेरच्या लोकांना सोसायटीत येऊ देण्यास प्रतिबंध केला जात आहे.

कठोर निर्बंधांची साथ

मुंबईत रेल्वे, बस, टॅक्सी आणि रिक्षांमध्ये प्रवासी संख्येवर निर्बंध घालण्यात आले आहेत. संपूर्ण मुंबईत नागरिकांच्या वावरावर निर्बंध कठोर केले. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क कमी करण्यात यश आल्याने संसर्गात मोठी वाढ झालेली नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here