मुंबईः मुंबईत लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील, तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिक मोठ्याप्रमााणात उत्सुक आहेत. ४५ वर्षांवरील दुसरा डोस घेणाऱ्यांचीही गेले काही दिवस फरफट सुरू आहे. मात्र, लशींचा मुबलक साठा आल्याचे समजताच शहरातील सर्वच केंद्रांवर प्रचंड गर्दी होते. हे चित्र टाळण्यासाठी पर्यावरणमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय ठरलेल्या लसीकरण मोहिमेचा वेग काही दिवसांपासून कमी झाला आहे. पालिका, सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज ४० हजारांपर्यंत लसीकरणाचा वेग पोहोचला असताना, अचानक तो संथ झाल्याने मुंबईकर संतप्त झाले आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसं ट्वीटही त्यांनी केलं आहे.

‘मुंबईत काही ठिकाणी लसीकरण केंद्रावंर होणारी गर्दी आणि मुंबई शहरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणे यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्यासोबत चर्चा केली. यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे लवकरच जाहीर केली जातील,’ असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री पालिकेकडे एक लाख लशींचा साठा उपलब्ध झाल्याचे जाहीर होताच, बुधवारी लसीकरण केंद्रांवर तुफान गर्दी लोटली होती. राजवाडी रुग्णालय, दहिसर करोना केंद्र, बीकेसी करोना केंद्र, भगवती रुग्णालयासह सगळ्याच केंद्रांवर बुधवारी सकाळपासून गर्दी झाली होती. काही ठिकाणी ही गर्दी हाताबाहेर जाण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले. लसीकरण केंद्रांवर गर्दी झाल्याने सकाळपासून उन्हातान्हात उभे राहिलेल्यांचे हाल झाले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here