म. टा. प्रतिनिधी,

वेळ बुधवारी मध्यरात्रीची… खान मियाँ आणि आबेदा बेगम घाबरलेल्या अवस्थेत हिंजवडी पोलिस ठाण्यात पोहोचतात. काही मुलांनी बेगमची छेद काढल्याची तक्रार देतात. त्यानंतर वाकड पोलिस ठाण्यात जाऊन सोनसाखळी चोरल्याची तक्रार दाखल करतात. एवढ्यावरच न थांबता पिंपरी पोलिस ठाण्यात जाऊन एका रुग्णवाहिकाचालकाविरोधातही तक्रार देतात आणि अचानक आपल्या मूळ वेषात प्रकट होतात. हे मियाँ, बेगम दुसरे, तिसरे कोणी नसून, पोलिस आयुक्त आणि सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे असल्याचे दिसताच उपस्थित पोलिसही चक्रावल्याचे पाहायला मिळाले.

वाचा:

पोलिस नागरिकांशी कशा प्रकारे व्यवहार करतात, हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्तांनी वेष बदलून विविध पोलिस ठाण्यात हजेरी लावली. या भेटीची दिवसभर शहरात जोरदार चर्चा रंगली होती. बुधवारी (५ मे) रात्री अचानकपणे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी मुस्लिम समाजातील मियाँ, बेगमचा वेष परिधान करून हिंजवडी, वाकड आणि पिंपरी पोलिस ठाण्यांत हजेरी लावली. सर्वप्रथम हिंजवडी पोलिस ठाण्यात जात कृष्ण प्रकाश यांनी बेगमची काही मुलांनी छेड काढल्याची तक्रार दिली. हिंदी आणि उर्दू भाषा बोलत कृष्ण प्रकाश यांनी हुबेहूब खानमियाँ साकारल्याने तक्रार दाखल करणारे पोलिस आयुक्तच आहेत, याची साधी कल्पनाही कोणाला आली नाही. हिंजवडी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेऊन त्वरित घटनास्थळी भेटही दिली. त्यानंतर मियाँ, बेगमने वाकड पोलिस ठाण्यात हजेरी लावली. तेथे सोनसाखळी चोरल्याची तक्रार दिली. शेवटी हे ‘जोडपे’ पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाले.

‘आम्हाला करोनारुग्ण नेण्यासाठी रुग्णवाहिका हवी आहे. मात्र, रुग्णवाहिकाचालक जादा पैसे मागतोय. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा,’ असे हे ‘जोडपे’ पोलिसांना सांगते. मात्र, जेवढ्या तत्परतेने हिंजवडी आणि वाकड पोलिस ठाण्यांत कार्यवाही करण्यात आली, तेवढी तत्परता पिंपरी पोलिस ठाण्यात दिसून आली नाही. ‘हे आमचे काम नाही, पिंपरी चौकीत जा,’ अशी कारणे तेथे उपस्थित पोलिसांनी दिली. मात्र, जेव्हा समोर उभे असलेले मियाँ आणि बेगम पोलिस आयुक्त आणि सहायक आयुक्त असल्याचे समजताच सर्वच अवाक झाले.

”वेषांतर करून पोलिस ठाण्यांना भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. आपली अडचण घेऊन तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांशी पोलिसांचा व्यवहार कसा आहे, हे पाहण्यासाठी पोलिस ठाण्यांना भेट दिली.”
प्रेरणा कट्टे, सहायक पोलिस आयुक्त

पोलिसांचाही विश्वास बसेना

अंगात घातलेला झब्बा, चेहऱ्यावर लावलेली दाढी, तांबडे केस आणि भाषेचा लहेजाही अगदी मुस्लिम बांधवांसारखा. त्यामुळे कोणत्याही पोलिस ठाण्यांत पोलिस आयुक्तांना कोणीच ओळखलेच नाही. मात्र, सर्व झाल्यावर जेव्हा आयुक्तांनी दाढी काढून आपण आयुक्त असल्याचे सांगितले, तेव्हा मात्र सर्वच पोलिस अवाक झाले. पोलिस आयुक्तच खान मियाँ बनून आले होते, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

वाचा:

करोनाकाळात काही निर्बंध असले तरी पोलिस नागरिकांशी कसे वागतात, हे पाहण्यासाठी मियाँ आणि बेगमच्या वेषात पोलिस ठाण्यांना भेट दिली. हिंजवडी, वाकड पोलिस ठाण्यांत खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पिंपरी पोलिस ठाण्यात थोडा उशिरा प्रतिसाद मिळाला.
कृष्ण प्रकाश, पोलिस आयुक्त,

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here