वाचा:
महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरात जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या होत्या. त्यानंतर मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. काल आंदोलन सुरू झाल्यापासून मनपा आयुक्त शंकर गोरे कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. अन्य अधिकाऱ्यांनी चर्चा केली असली तरी त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे जोपर्यंत आयुक्त येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. रात्री नऊ वाजेपर्यंत महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे आणि तोफखाना पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी आंदोलन मागे घेण्यासाठी किरण काळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र नगरकरांची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही मनपा सोडणार नाही, अशी परखड भूमिका काळे यांनी घेतल्यामुळे अधिकाऱ्यांचा नाइलाज झाला. काळे यांच्यासह आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनासमोरच चटई अंथरूण मुक्काम केला. मनपाच्या आवारात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यात सहभागी झाले आहेत. आंदोलकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुणी झोपण्यासाठी चटई, पांघरून आणून दिले तर कोणी स्वतःच्या घरून आंदोलकांना जेवणाचे डबे, पिण्याचे पाणी आणून दिले.
रात्री उशिरा काळे आणि आंदोलकांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नगरकरांशी संवाद साधला. शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता शहरातील परिस्थितीला तेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आंदोलकांना देण्यासाठी कोणतेच ठोस उत्तर आपल्याकडे नसल्यामुळेच आणि आमदारांच्या दबावामुळेच आयुक्त इकडे फिरकले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
युवासेनेचे नेते विक्रम अनिल राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. मला काहीही झाले तरी चालेल, पण सामान्य माणसाचे बेडसाठी हाल होता कामा नयेत. महापालिकेने माणुसकी, संवेदनशीलपणे वागावे, अशा भावना काळे यांनी व्यक्त केल्या.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times