सिंधुदुर्ग: संसर्गाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार केला जाणार असून तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करायला हवेत असे आज मुख्यमंत्री यांनी सांगितले. ( )

जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. तिसरी लाट थोपवण्यासाठी आणि ही लाट आलीच तर ती नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यावर भर दिला पाहिजे. दिवसाला १० लाख लोकांना लस देण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे. त्यासाठी लस उत्पादकांसोबत चर्चा सुरू आहे पण, लस पुरेशी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्य सुविधा वाढवूनच तयारी करावी लागणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

गेले वर्षभर करोनाशी आपण लढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक सुविधा आपण उभ्या केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्परतेने आणि जलदगतीने सुविधा उभारण्याचे काम करत आहेत. राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल पण सध्या महत्त्वाची गरज आहे ती ऑक्सिजनची. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे ही चांगली बाब आहे. राज्यात सध्या मिशन ऑक्सिजन राबविण्यात येत आहे. जिल्ह्याची गरज ओळखून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवावा. सध्याचा विषाणू हा जलदगतीने पसरत आहे. त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोविडवर मात करता येणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा व निधी देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याला सध्या ४ टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. त्यामध्ये आणखी २ टन वाढ करून जिल्ह्याला ६ टन ऑक्सिजन पुरवठा करावा तसेच एसडीआरएफचा निधीही सिंधुदुर्गला लवकर मिळावा अशी मागणी केली. नॉन कोविड रुग्णांसाठीही ऑक्सिजनचे नियोजन करावे. जिल्ह्यात सध्या माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातून करोना रुग्णांचा शोध घेतला जात असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासन मिळून कोविडचा सामना करत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा खनिकर्म निधीमधून घेण्यात आलेल्या ६ रुग्णवाहिका, ५० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यांचेही लोकार्पण करण्यात आले.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार , वैभव नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here