राज्यात करोनाचा कहर कायम असतानाच, कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील स्थितीसुद्धा दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे चित्र आहे. तुटपुंजी आरोग्ययंत्रणा, नागरिकांकडून सर्रासपणे होणारे नियमांचे उल्लंघन व यामुळे वाढत असलेला संसर्ग आणि प्रतिबंधक लशींचा प्रचंड तुटवडा यांमुळे या जिल्ह्यांतील करोनासंकट अधिकच गडद होताना दिसत आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गातील गाव, वाड्यावस्त्यांवर करोनाचा विळखा घट्ट होत असून, बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दोन्ही जिल्ह्यांत दररोज ६०० ते ८०० नव्या बाधितांची नोंद होत आहे. गेल्या महिनाभरात मृत्यूचा दर वाढल्याने चिंतेत अधिकच भर पडत आहे. प्रशासन प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असले तरी याकामी आरोग्ययंत्रणा तुटपुंजी ठरताना दिसत आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसून, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे समस्या अधिकच वाढली आहे.
करोनारुग्णांची वाढती संख्या पाहता तूर्तास संचारबंदी शिथिल करणे कठीण आहे. मात्र संचारबंदी असूनही नियमांचे उल्लंघन करून व्यापार, उद्योग सुरू ठेवले जात आहेत. तसेच गाव पातळीवर नियमबाह्य लग्न समारंभ होत आहेत. गुहागरमधील एका गावात करोनाबाधित असूनही वर बोहल्यावर उभा राहिला. या लग्न वऱ्हाडींना ग्रामपंचायतीने ५० हजारांचा दंड ठोठावला, तर उपस्थित भटजीसह सर्वांनाच विलगीकरणात ठेवण्यात आले. अशाप्रकारे नियमांचे पालन न केल्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्यात अडथळा येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व रत्नागिरी पालिका बाजारपेठेत दुचाकीचालकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या बाजारपेठांमध्ये सर्व प्रकारच्या खासगी वाहनांची वाहतूक शुक्रवारपासून बंद करत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवेतील मालवाहतूक वाहनांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यासाठी ऑक्सिजन प्लांट व रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
तळकोकण लशीपासून दूर
लसटंचाईमुळे तळकोकणातील ग्रामीण भाग अद्यापही जवळपास लशीपासून दूरच आहे. गावे लांब असल्याने सद्यस्थितीत लॉकडाउनमुळे ग्रामस्थांना आरोग्य केंद्रात जाऊन लस घेणे शक्य होत नाही. यातूनही कोणी आल्यास लस संपल्याचे सांगण्यात येते. परिणामी दूरवरून आलेल्या नागरिकांना हताश होऊन परतावे लागत आहे. यातच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळाल्याशिवाय १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने कोकणवासींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times