सिंधुदुर्ग, सोलापूरसह अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गमध्ये शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. हवामान विभागानं राज्यात पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारादेखील दिला आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी आंब्याच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. इतकंच नाहीतर हळदीच्या शेतीचंही नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाने आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडं कोसळली आहेत. नांदेड, हिंगोली आणि लातूरमध्ये पावसाने चांगलंच नुकसान झालं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं वातावरण तयार होत आहे. यात उष्णताही वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे.
आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि गाराही पडण्य़ाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ९ मेपर्यंत राज्यभर असंच वातावरण असणार आहे. सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, मे महिन्यात उन्हाचा तडाखा, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस असंच हवामान असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, तर नागरिकांनीही हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आणखी आठवडाभर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट असणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, लातूर आणि उस्मानाबादच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली असून काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि विजांचा गडगडाट होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times