औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातून पट्टेरी वाघांच्या एका जोडीचे काल (१२ फेब्रुवारी) मुंबई महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आगमन झाले. दिल्लीतील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर औरंगाबाद येथून त्यांना भायखळा येथील प्राणिसंग्रहालयात आणण्यात आलं. या वाघांच्या जोडीमध्ये ६ वर्षे वय असलेल्या एका वाघिणीचा (मादी) समावेश असून, तिचे नाव ‘करिष्मा’ आहे. तसेच वाघाचे (नर) नाव ‘शक्ती’ असे असून, त्याचे वय ४ वर्षे आहे. या जोडीच्या बदल्यात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातून दोन जोडी ‘चितळ’ (Spotted Deer) आणि दोन जोड्या ‘चित्रबलाक’ (रंगीत करकोचा) (Painted Storks) सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला देण्यात आले आहेत. औरंगाबाद येथून आणण्यात आलेल्या करिष्मा आणि शक्ती या वाघांना प्राणिसंग्रहालयाच्या क्वारंटाइन सुविधेमध्ये ठेवण्यात आलं आहे. लवकरच त्यांना नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रदर्शित केले जाईल, असं व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं.
केअर टेकर्सला अश्रू अनावर
शक्ती आणि करिष्मा या दोघांचा जन्म सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातच झाला. सिद्धार्थ आणि समृद्धी यांच्यापासून त्यांचा जन्म झाला. सिद्धार्थ आणि समृद्धीचा जन्मही येथेच झाला होता. सिद्धार्थ- समृद्धी आणि शक्ती-करिष्मा यांची काळजी घेणारे महम्मद जिया व चंद्रकांत काळे हे केअरटेकर निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्यांना पिंजऱ्यात बंद करताना या दोघांना अश्रू अनावर झाले. त्यांची ही अवस्था पाहून संजय नंदन, सोमनाथ मोटे, महंमद जफर, प्रवीण बत्तीसे, सुरेश साळवे हे कर्मचारीही भावूक झाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times