याविषयी सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की शिंदगाव येथील एका शेतकरी तरुणाला आजारपणामुळे त्याच्या मोठ्या भावाने आलूर (ता. उमरगा) येथे डॉक्टरांकडे नेले. करोनाची लक्षणे दिसत असल्याचे सांगून डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मोठ्या भावाने त्याला घरी नेले. या तरुणाला चार मुले असून कुटुंबाशी चर्चा करुन हा रुग्ण घराबाहेर झोपला होता. त्या दरम्यान कुटुंबातील सर्वजण शेताकडे गेले.
करोनाच्या भीतीने हा तरुण शेताकडे गेला आणि विहिरीवरील लाईटच्या बॉक्समध्ये हात घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातून सुदैवाने बचावला. त्यानंतर त्याने कोरड्या विहिरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. विहिरीत झाडेझुडपे असल्याने तो मध्येच जाळीमध्ये अडकला. हा प्रकार कुटुंबातील एका व्यक्तीने पाहिला, तोवर आजूबाजूचे नागरिक जमा झाले होते. त्यांनी तरुणाला विहिरीबाहेर काढले तेव्हा हा तरुण बेशुद्ध व जखमी अवस्थेत होता.
मात्र, या तरुणाचा मृत्यू झालाय असा समज त्याच्या कुटुंबीयांचा झाला. शिंदगावचे सरपंच विवेकानंद मेलगिरे यांना ही घटना समजताच ते घटनास्थळी पोहचले तेव्हा या तरुणाचे श्वास सुरु आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर तातडीने मिलगिरे तातडीने अॅम्ब्युलन्स बोलवून तरुणाला उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
जखमी अवस्थेतील तरुणावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. तेव्हा त्याला करोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. उपचारानंतर तरुण शुद्धीवरही आला होता. मात्र, शनिवारी उपचारादरम्यान दुर्देवाने मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times