‌म. टा. विशेष प्रतिनिधी,
संसर्गाच्या प्रमाणामध्ये वाढ होत असताना, एचआरसीटी चाचण्या करण्याचे प्रमाण वाढते होते. मात्र, आता मुंबईतील रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असताना, हे एचआरसीटी तसेच सिटीस्कॅन चाचण्यांचे प्रमाण आता कमी व्हायला लागले आहे. पूर्वी दिवसाला १५० ते २०० रुग्ण या चाचण्यांसाठी येत होते. त्यांच्या अहवालांमध्ये ‘सिटीस्कोअर’ अर्थात फुफ्फुसातील संसर्गही वाढलेला दिसत होता. या स्कोअरच्या आधारे रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करणे वैद्यकीय तज्ज्ञांना सोपे जात होते. मात्र, आता हा सिटीस्कोअर उतरणीला लागला आहे.

संसर्गाची तीव्रता सध्या कमी झाल्यामुळे चाचण्यांसाठी येणाऱ्या व्यक्तींच्या प्रमाणामध्ये घट झाली आहे, असे वैद्यकीय निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. रेडिओलॉजिस्ट डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी सांगितले की, पूर्वी चाचण्या करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढते होते. या चाचण्यांच्या अहवालांमध्ये सिटीस्कोअर वाढलेला दिसत होता. या स्कोअरच्या आधारे वैद्यकीय तज्ज्ञांना रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यासंदर्भातील निर्णय घेणे अधिक सुकर होत होते. मात्र, आता या प्रमाणामध्ये घट झाली आहे. मागील आठवड्यापासून ही रुग्णसंख्या ५० ते ६० इतकी आहे. या रुग्णांमध्येही अनेकांचे सिटीस्कोअर खालावलेले नाहीत. काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आता दिसत नसल्याचे आशादायक चित्र असल्याचे डॉ. ठक्कर यांनी स्पष्ट केले. संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. आर. मॅन्थू यांनी विविध वयोगटामध्ये एचआरसीटी अहवाल करण्याचे प्रमाण अधिक होते. यातील काही जण हे करोना प्रतिबंधासाठी आरटीपीसीआर चाचण्या करण्यापूर्वी या चाचण्या करून घेत होते. सरकारने दिलेल्या नव्या निकषानुसार आरटीपीसीआर चाचणीची तुलना या चाचणीसोबत होऊ शकत नाही. मात्र, ही चाचणी रुग्णांच्या वैद्यकीय उपचारामध्ये उपयुक्त चाचणी आहे हे सामान्यांनी समजून घ्यायला हवे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मुंबईमध्ये करोना संसर्गाची लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण ३३ हजार ९७६ इतके आहे, तर लक्षणे असलेली रुग्णसंख्या ही १४ हजार ४२ इतकी नोंदवण्यात आली आहे. अत्यवस्थ रुग्णसंख्या १ हजार ४८१ नोंदवण्यात आली आहे. डॉ. महेश पाटील यांनी अनेक रुग्ण चाचण्या करून न घेता घरीच राहतात. प्रकृती अधिक खालावल्यानंतर ते रुग्णालयामध्ये धाव घेतात. एचआरसीटी रक्ताच्या चाचण्या करण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरीही आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे, या चाचण्यांचा वेग कमी होता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here