शिवसेनेचं मुखपत्र ”त लिहिलेल्या लेखात राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकांचे विश्लेषण केलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या लढ्याची तुलना त्यांनी अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशी केली आहे. मोदी-शहा का हरले, याची काही कारणं त्यांनी दिली आहेत. ‘नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पण निवडणूक काळात त्यांनी स्वतःला ममता बॅनर्जी यांच्या बरोबरीत आणून ठेवलं. सर्वोच्च नेते म्हणून ते वागले नाहीत. त्यामुळं बंगालच्या लोकांना मोदींचं अप्रूप वाटलं नाही व ममतांसमोर उभ्या राहिलेल्या मोदींचा पराभव झाला,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘प. बंगालच्या जनतेला ‘जय श्रीराम’चा नारा व धार्मिक फाळणीचा विचार पटला नाही. तेथील जनतेला त्यापेक्षा वेगळं काही हवं आहे. आपली भाषा, संस्कृती, स्वाभिमानावर ही जनता प्रेम करते. प्रसिद्धी माध्यमांचा धुरळा उडवून समाजमाध्यमांवर विरोधकांचा खोटा प्रचार व बदनामी ही शस्त्र आता जुनाट व बोथट झाली. याच न्यायानं उद्या मोदी व शहांच्या प्रतिमांना गंज चढेल. ते होऊ द्यायचं नसेल तर त्यांना स्वतःला बदलावं लागेल,’ असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. ‘भाजपनं देशातील राजकीय संस्कृती व परंपरा मोडली, याचा फटका त्यांना बसला. हे त्यांनी स्वीकारायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘प्रचाराच्या काळात मोदी-शहांच्या सभांना व रोड शोना झालेली गर्दी स्थानिक नव्हती. झारखंड, बिहार, ओडिशा या बंगालच्या सीमेवरील राज्यांतून रोज गर्दी विकत आणली जात होती, असंही राऊत यांनी एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं म्हटलं आहे. ‘प. बंगालात हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणावर रोजीरोटीसाठी आले आहेत. ‘जय श्रीराम’च्या गर्जनेचं त्यांना आकर्षण वाटलं. ममतांनी या हिंदी भाषिक मतांकडं पूर्ण दुर्लक्ष करून स्थानिकांना भावनिक साद घातली. बाहेरचे लोक येऊन बंगाल बिघडवत आहेत ते रोखायला हवे, हा मुद्दा त्यांनी लावून धरला. बंगालचा आम्ही गुजरात होऊ देणार नाही, असंही त्या सांगत राहिल्या. त्या मुद्द्यांचे रॉकेट उडाले आणि ज्यात भाजपची लंका जळाली,’ असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.
‘मोदी किंवा शहांनी कितीही ताकद लावली तरी त्यांचा पराभव होऊ शकतो हे प. बंगाल, केरळ व तामीळनाडूनं दाखवून दिलं. मोदी हे नक्कीच लोकप्रिय नेते आहेत, पण त्यांचं निवडणूक जिंकण्याचं व्यवस्थापन निर्दोष नाही. समोरचं कमजोर नेतृत्व, विरोधकांकडं साधनांची कमतरता हेच मोदी-शहांचं राजकीय बलस्थान आहे,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या घसरणीबद्दल खंत
ममतांच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना संजय राऊत यांनी काँग्रेसच्या घसरणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘२०२४ च्या राजकीय पटलावर तेव्हा काँग्रेस कोठे असेल? ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीला नवी दिशा मिळेल काय? विरोधी पक्षानं एकत्र यायचं ठरलं तर त्या आघाडीचं नेतृत्व कोणी करावं?,’ असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times