नांदेड : आई ही देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे, जी आयुष्यभर कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या मुलांवर आणि कुटुंबावर प्रेम करते. तसंच प्रसंगी कितीही मोठा संघर्ष वाट्याला आला तरीही आपल्या कुटुंबाला प्रत्येक सुख-दु:खात साथ देते. याचीच प्रचिती नांदेडमध्ये आली आहे.

शहरातील राम घाट या स्मशानभूमीत गेल्या नऊ वर्षापासून मोठ्या धाडसानं आणि धैर्याने एक महिला काम करत आहे. कोरोना काळातही सरण रचण्यापासून ते अंत्यसंस्कारानंतरची राख साफ करण्यापर्यंतचे काम करत ही महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.

परमिंदर कौर या आपल्या 65 वर्षीय महिला नांदेड जुन्या शहरातील रामघाट स्मशानभूमीत काम करत असून त्या याच ठिकाणी सासू, पती, एक मुलगा आणि एका मुलीसह वास्तव्यास आहेत. परमिंदर कौर या मूळच्या पंजाबच्या अमृतसरमधून नांदेड इथं आल्या आणि मागील नऊ वर्षांपासून स्मशानभूमीत आपल्या कुटुंबासोबत राहतात.

परमिंदर कौर यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. पती गुरुदेवसिंघ मल्ली हे अशिक्षित आहेत. परमिंदर कौर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नोंदणी, सरण रचणे, राख काढणे अशी सर्व कामं करतात. तुटपुंज्या मानधनात परमिंदर कौर या संसाराचा गाडा हाकत आहे.

स्मशानभूमी म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते. अशा ठिकाणी परमिंदर कौर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. एका खोलीच्या पत्राच्या शेडमध्ये आपला संसार करत आहेत. त्या शेडमध्येच किचन आणि तिथेच बेड. परमिंदर कौर यांना त्यांच्या या कामात पती गुरुदेवसिंग मल्ली आणि त्यांचा मुलगाही सहकार्य करतात.

परमिंदर कौर यांच्या हिंमतीला आणि धैर्याला दाद देत रामघाटची व्यवस्थापन समितीही त्यांच्या कुटुंबास चांगलं सहकार्य करत आहे. हालाखीची परिस्थिती असल्याने परमिंदर कौरने मुलीला याच ठिकाणी जन्म दिला आणि तिचं नाव खुषी असं ठेवलं आहे. या कुटुंबाच्या संघर्षाचं शहरात विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here