महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी मानखुर्द येथून दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे २१ कोटी रुपयांचे सात किलोपेक्षा अधिक घन स्वरूपातील युरेनियम हस्तगत केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्वालाग्राही आणि तितकेच घातक युरेनियम मुंबईत सापडल्याने खळबळ उडाली होती. एटीएसने जिगर पांड्या आणि अबू ताहीर या दोघांना याप्रकरणात अटक केली होती. बेकायदा स्फोटक प्रकरण असल्याने एनआयएने आपल्या अधिकारातंर्गत हे प्रकरण वर्ग करून घेतले आहे.
एटीएसनं कशी केली कारवाई?
युरेनियम बाळगण्यास तसेच त्याची विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. असे असतानाही एक तरुण घन (रॉड) स्वरूपातील युरेनियमची विक्री करीत असल्याची माहिती एटीएसला मिळाली. एटीएसचे उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपाडा युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष भालेकर, सहायक निरीक्षक प्रशांत सावंत यांच्या पथकाने युरेनियम विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या ठाणे येथील जिगर पांड्या या तरुणाला ताब्यात घेतले. जिगर याच्याकडे काही प्रमाणात युरेनियम सापडले. हे युरेनियम मानखुर्द, मंडाला येथे राहणाऱ्या अबू ताहीर याने विक्री करण्यासाठी दिल्याचे जिगर याने सांगितले. जिगरने दिलेल्या माहितीवरून एटीएसच्या पथकाने ताहीर याला पकडले. ताहीर याने कुर्ला स्क्रॅप मर्चंट असोसिएशन (मानखुर्द) येथील गाळ्यामध्ये हे युरेनियम ठेवण्यात आले असून ते भंगारात मिळाल्याचे सांगितले. युरेनियम घातक असून त्यातून किरणोत्सर्ग होण्याची भीती असल्याने एटीएसच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती भाभा अणुशक्ती केंद्राला दिली. येथील तज्ज्ञांनी सुरक्षितरित्या हे युरेनियम ताब्यात घेतले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times