कल्पेशराज कुबल
kalpeshraj.kubal@timesgroup.com

‘माणसांनी केवळ कुटुंबापुरतं न जगता देशासाठी आणि समाजासाठी काही तरी केलं पाहिजे’ असा सुंदर विचार मांडणारं एक वाक्य सिनेमात आहे. परंतु, हा विचार गोष्टरुपी कथेत किंबहुना सिनेमातून लेखक, दिग्दर्शकाला तितक्या परिणामकारक आणि मनोरंजक पद्धतीने मांडता आलेला नाही. ठरावीक चौकटीत पटकथेचा होणारा विस्तार आणि त्यात बोलून गुळगुळीत झालेल्या संवादामुळे हा सारा मर्मस्पर्शी दाह उथळ वाटू लागतो. कथानकाची आणि त्यातून उलगडणाऱ्या विविध प्रश्नोत्तरांची सांगड लेखकाला मांडता आलेली नाही. सोबतच लिहिलेली प्रत्येक गोष्ट चित्रित करून पडद्यावर दिग्दर्शकाने मांडली आहे का? असा सवाल देखील उत्तरार्धात सिनेमा लांबल्यावर मनात येतो. मूळ कथा आणि साथीला ओघाने येणारे कथानकातील विविध मुद्दे यांची अधिक चांगली सांगड दिग्दर्शकाला सिनेमात घातला आली असती. कलाकारांची उत्तम फळी हाती असताना लेखन आणि दिग्दर्शकीय कमतरतेमुळे सिनेमा प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यास कमी पडला आहे.

‘दाह’ ही गोष्ट आहे दिशा (सायली संजीव) या मुलीची. मेडीकलच्या शेवटच्या वर्षाला ती शिकतेय. मुळात ती डॉक्टर घराण्यातलीच आहे. सुप्रसिद्ध डॉक्टर साने (डॉ. गिरीश ओक) आणि अनघा साने (राधिका विद्यासागर) यांची मुलगी दिशा देखील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टरी पेशात येणार आहे. दिशा ही साने कुटुंबीयांची दत्तक मुलगी आहे. परंतु ही बाब स्वतः दिशा आणि तिच्या आईला म्हणजेच अनघा साने हिला देखील माहित नाही. दिशा आणि तिचा मित्र डॉ. समीर भोसले (सुहृद वार्डेकर) एकमेकांच्या प्रेमात पडतात. समीर आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून अमेरिकेला स्थायिक होण्यासाठी जातो. परंतु, तिकडे भारतात समीर आणि दिशाच्या लग्नाची बोलणी सुरु असतात. सर्व सुरळीत सुरु असताना समीरच्या घरच्यांकडून अचानक लग्नाला विरोध दर्शवला जातो. पण, या विरोधाचं कारण काय? अमेरिकेला गेलेला समीर पुन्हा भारतात येतो का? समीर आणि दिशा यांचं लग्न होतं का? दिशा साने कुटुंबाची दत्तक मुलगी आहे ही सत्य परिस्थिती तिला समजते का? दिशा आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून पुढे काय करते? या सगळ्याची उत्तरं ‘दाह’ सिनेमात दडलेली आहेत. परंतु, हा सर्व कथानकाचा विस्तार मूळ गोष्टीला लांबण लावणारा झाला आहे. सिनेमात काही सामाजिक विषयांवर देखील भाष्य करण्यात आलं आहे. परंतु ते देखील वरवर आणि उथळ आहे. सायली संजीव, डॉ. गिरीश ओक यांनी आपल्या भूमिका उत्तम पद्धतीनं निभावण्याचा प्रयत्न केला असला तरी दिग्दर्शकीय पातळीवर प्रसंग जमून आले नाहीत. त्यामुळे कलाकरांना देखील फार सर्जनशील काम करता आलेलं नाही. सिनेमाच्या लांबीला संकलकाची कात्री आणखी लागणं अपेक्षित होतं. एकंदर सिनेमा आपलं मनोरंजन करण्यात जरी कमी पडला असला सिनेमाच्या गोष्टीचा मर्म बोधदायक आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here