समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करत ‘करोना हारतीवा जिटउवा’ (कोरोना हरेल, मेळघाट जिंकेल) ही व्हिडीओ पटांची मालिकाच सुरू करण्यात आली आहे. विविध माध्यमांतून ती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. यासाठी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी पुढाकार घेतला आहे.
करोना प्रतिबंधासाठी दक्षता आणि स्वयंशिस्त अत्यंत महत्वाची आहे. हे लक्षात घेऊन मेळघाटात व्यापक लोकशिक्षण व जनजागृतीसाठी मोहीम राबवण्यात येत आहे. आवश्यक दक्षता घेऊन करोनापासून दूर राहता येते. योग्य उपचारांनी करोना बरा होतो. साथीचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासकीय प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्यासाठी दक्षतेचे महत्व नागरिकांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे.
मेळघाटातील नागरिक बांधवांना त्यांच्या स्वत:च्या भाषेत माहिती देणे आवश्यक होते. जेणेकरून कुटुंबातील सर्वजण ही माहिती जाणून घेऊ शकतील. त्यामुळे हा उपक्रम नियमितपणे सुरु करण्यात आला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यापुढेही विविध विषयांवर अशी माहिती देण्यात येणार असल्याचे श्री. सेठी यांनी सांगितले.
मालिकेतील व्हिडीओद्वारे साथीचे संक्रमण, आजाराची माहिती, लक्षणे, घ्यावयाची काळजी, आवश्यक उपचार याबाबत डॉ. दयाराम जावरकर हे मेळघाटचे सुपुत्र व एम. बी. बी. एस., एम.डी. तज्ज्ञ अस्सल कोरकू भाषेत प्रेक्षकांशी संवाद साधतात. ममता सोनकर यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. यु ट्युब, फेसबुक, व्हाटसॲप आदी सोशल मीडियाद्वारे ही व्हिडीओपटांची मालिका नियमित प्रसारित करण्यात येत असून, त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
करोनाबाबत सर्व शंकांचे निरसन या माहितीतून होते. नागरिकांना आरोग्य शिक्षण देणारे एक नवे माध्यमच याद्वारे उपलब्ध झाले आहे. आरोग्यतज्ज्ञांबरोबरच प्रशासनातील विविध अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आदी व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत आणि अनेकविध विषयांची माहिती नागरिकांना स्वत:च्या भाषेत घरबसल्या मिळू लागली आहे.
अनेक प्रकारची महत्वाची माहिती स्थानिक नागरिकांना बरेचदा मराठी व हिंदी माध्यमातून मिळते. मात्र, भाषेमुळे तांत्रिक किंवा महत्वाची माहिती स्थानिक बांधवांना जाणून घेणे कठीण जाते. हे लक्षात घेऊन हा उपक्रम कोरकू भाषेत सुरु करण्यात आला आहे. यात माहिती देणारी डॉक्टर मंडळी ही स्थानिकच असल्याने अत्यंत सुलभ भाषेत ते व्हिडीओद्वारे नागरिकांशी संवाद साधतात.
मेळघाटसारख्या दुर्गम भागात दृकश्राव्य माध्यम परिणामकारक ठरते. हे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाबाबत स्थानिकांकडून अत्यंत स्वागतार्ह प्रतिक्रिया मिळत आहेत. कोरकू भाषेतून यापूर्वीही विविध संदेश प्रसारित केले आहेत. त्याचबरोबरच, आरोग्य शिक्षण देणारी ही मालिका नियमितपणे प्रसारित करण्यात येईल, असेही श्रीमती सेठी यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times