जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात माहिती देतांना राजेश टोपे यांनी सांगितले की, ज्या करोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे.
आजाराची लक्षणे आणि परिणाम कोणते?
नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगतानाच या आजाराचे लवकर निदान होणं गरजेचं असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
या आजावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन देखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, असं आश्वासन टोपे यांच्याकडून देण्यात आलं आहे. तसंच या आजारामुळे करोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times