मुंबई: काँग्रेस पक्षाकडून सातत्याने महापुरूषांचा अपमान केला जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दोन लेख प्रकाशित करण्यात आले असून, एकात त्यांना माफीवीर तर, दुसऱ्या लेखात गलिच्छ लिखाण केलं आहे. या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी आणि काँग्रेस पक्षाने माफी मागावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी केली आहे. शिवसेना सत्तेसाठी आणखी किती लाचार होणार, असा सवालही त्यांनी केला आहे.

मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीने हटवण्यात आला, राजस्थानात शाळांमधून , पं. दिनदयाळ उपाध्याय यांचे छायाचित्र काढून टाकण्याचा आदेश इत्यादींबाबतही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसने महापुरूषांच्या अवमानाची मालिकाच सुरू केली आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकात वीर सावरकरांबाबत दोन लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. एक लेख ‘स्वातंत्र्यवीर नव्हे माफीवीर’ असा असून, दुसरा लेख ‘अंधारातील सावरकर’ असा आहे. अतिशय गलिच्छ आणि विकृत स्वरूपाचे लिखाण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत या दोन्ही लेखांमधून करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील घाण महाराष्ट्रात येणार नाही, असे शिवसेनेने म्हटले होते. आता या ताज्या अंकातील लिखाणावर शिवसेना सहमत आहे का? सत्तेसाठी आणखी किती लाचारी पत्करणार, याचे उत्तर शिवसेनेने द्यायला हवे, असं फडणवीस म्हणाले. काँग्रेस पक्षाने माफी मागून हे पुस्तक मागे घ्यावे किंवा या पुस्तकावर राज्य सरकारने बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्य सरकारने कारवाई केली नाही तर भाजप याविरोधात पावलं उचलेल. मध्य प्रदेशात शिवरायांचा अपमान, राजस्थानमध्ये वीर सावरकरांचे छायाचित्र काढण्याचा फतवा असे एकापाठोपाठ एक प्रकार होत असताना त्याच काँग्रेस पक्षाला मित्रपक्ष म्हणून स्वीकारणाऱ्या शिवसेनेला याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्यावेच लागेल, असे फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मध्य प्रदेश सरकारने तत्काळ माफी मागून ज्याठिकाणी पुतळा होता, त्याच ठिकाणी तो पुनर्स्थापित करावा. शिवछत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना अतिशय तीव्र आहेत, याची सरकारने दखल घ्यावी, असंही ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here