नाशिक : करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे नाशिक जिल्ह्यात उद्यापासून बारा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आज घरातील अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी जागोजागी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आज सकाळपासून किराणा दुकानं, पीठ गिरणी आणि रेशन दुकानाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

अनेक ठिकाणी रांगा लावून खरेदी तर अनेक दुकानाबाहेर झुंबड उडत सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. उपनगरासह मुख्य बाजारपेठेत साठेबाजीला उत आला आहे. सकाळपासून शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. लॉकडाऊनमुळे रेशन दुकाने खुली होण्यापूर्वी नागरिकांनी रांगा लावल्या तर पीठ गिरणीतही जास्तीचे दळण दळण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कारंजा भागात अंड्यांचे ट्रे घेण्यावर ग्राहकांचा भर होता. रस्त्यालगत पार्किंग झाल्याने वाहनांची कोंडी यावेळी पाहायला मिळाली. दरम्यान, दहा दिवस शहरात कडक लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊन काळात शहरातील सर्व दुकाने बंद राहतील. हॉस्पिटल आणि मेडिकल सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. निर्बंध असतानाही लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कडक लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना वैद्यकीय कारणाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीसाठी बाहेर फिरता येणार नाही. नागरिकांना किराणा आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी परवा दुपारपर्यंतचा वेळ असेल. १२ मे रोजी दुपारी १२ पासून २२ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असेल,’ अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.

तर ‘नाशिक बाजार’ या अ‍ॅपवरूनही नागरिकांना भाजीपाला, दूध, औषधे यांची खरेदी करता येईल, असंही पालिका आयुक्तांनी म्हटलं आहे. खरंतर, याआधीही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी कडक निर्बंध लादले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच कडक लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here