नवी दिल्ली: पर्यावरण तज्ज्ञ व द एनर्जी अण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे (टेरी) संस्थापक व माजी संचालक डॉ. आर. के. पचौरी यांचे आज दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. पचौरी यांना मंगळवारपासून लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाबाबत टेरीकडून ट्विटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

‘टेरी’चे संस्थापक संचालक डॉ. आर. के. पचौरी यांचे निधन झाले आहे. आमचा संपूर्ण टेरी परिवार या दु:खाच्या क्षणी पचौरी यांच्या कुटुंबीयांसोबत आहे, असे ट्विट ‘टेरी’कडून करण्यात आले आहे. २०१५ पर्यंत पचौरी यांच्याकडे टेरीचे संचालकपद होते. पचौरी यांच्याकडून २०१५ मध्ये अजय माथुर यांनी सूत्रे स्वीकारली होती. माथुर यांनी पचौरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आज टेरीचे जे काही स्थान आहे, त्यामागे सारी मेहनत पचौरी यांची आहे. टेरीला आघाडीच्या संस्थांमध्ये स्थान मिळवून देण्यात पचौरी यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे, अशा भावना माथुर यांनी व्यक्त केल्या.

आर. के. पचौरी ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’चे (आयपीसीसी) २००२ ते २०१५ पर्यंत अध्यक्ष होते. पचौरी यांच्या कार्यकाळात आयपीसीसीला नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दरम्यान, पचौरी यांच्यावर एका माजी महिला सहकाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या आरोपानंतर त्यांनी ‘टेरी’ प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here