ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या टँकरला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. मात्र, त्याच्यात तांत्रिक बिघाड होणार नाही, याकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. म्हणूनच सोमवारी पहाटे बीडला जाणारा हा टँकर जामखेडजवळ दोनदा बंद पडला. प्रथम जामखेड शहराजवळ हा टँकर बंद पडला. पहाटेच्यावेळी काय करायचे, हे चालकाला सुचेना. टँकरसोबत असलेल्या पोलिसाला जामखेडमधील सामाजिक कार्यकर्त्यांची आठवण झाली. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करण्यात आला. काही वेळातच कोठारी मदतीला धावून आले. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी राहुल धावपळ करून दुरूस्तीसाठी लागणारे साहित्यही उपलब्ध केले. काही वेळात दुरूस्ती होऊन टँकर जामखेडहून पुढे रवाना झाला. सुटकेचा नि:श्वास टाकून कार्यकर्ते घरी पोहचले.
काही वेळात पुन्हा त्या पोलिस कर्मचाऱ्याचा फोन आला. जामखेडपासून पुढे गेल्यावर सौताडा घाटात टँकर पुन्हा बंद पडला होता. यंत्रणेची जमवाजमव करून जामखेडकर पुन्हा मदतीला धावले. टँकरची दुरूस्ती करून पुढे रवाना करण्यात आला. अखेर टँकर बीडच्या जिल्हा रुग्णालयात सुखरूप पोहचल्याचा निरोप आल्यावरच जामखेडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि बीडमधील रुग्णांचा टांगणीला लागलेला श्वास मोकळा झाला.
ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये बिघाड होण्याच्या घटना राज्यात ठिकठिकाणी घडत आहेत. पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त दिला आहे. पुरवठ्यात खंड पडू नये, यासाठी टँकरचा अहोरात्र प्रवास सुरू आहे. त्या गडबडीत टँकरच्या दुरूस्ती, देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times