दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी स्वतःच्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. (Deepali Chavan suicide) या घटनेने राज्यासह वन विभागही हादरले होते. दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेले चार पानी पत्र सापडले होते. त्यानंतर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना नागपुरातून अटक करण्यात आली होती.
यानंतर मेळघाट प्रकल्पाचे माजी संचालक श्रीनिवास रेड्डी यांनाही निलंबित करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेड्डी यांच्याकडे वारंवार तक्रार करून त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सुसाइड नोटमधून समोर आले होते. यानंतर पोलिसांकडून रेड्डी यांना अटक करण्यात आली होती. पण आज त्यांना कोर्टाकडून अंतरिम जामिन मंजूर करण्यात आला आहे.
खरंतर, याआधीही रेड्डी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अचलपूर न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून ते पसार झाले होते. अमरावती पोलीस त्यांचा ठिकठिकाणी शोध घेत होते.
यावेळी ते नागपुरात असल्याचे लोकेशनवरून दिसत होते. अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले. त्यांनी गुन्हे शाखा तसेच स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डींचा शोध घेतला. रात्री उशिरा शहरातील एका हॉटेलजवळ ते दिसून आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times