‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या ” या मालिकेत शौनक जहागीरदारची भूमिका साकारणाऱ्या योगेश सोहनी या अभिनेत्याला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा बनाव करून एका अज्ञात स्कॉर्पिओ कार चालकाने लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास उर्से टोलनाक्या जवळील सोमाटणे एक्झिट येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी योगेश सोहनी (वय- ३२, रा. अंधेरी पूर्व, मुंबई) यानं तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून एका अज्ञात स्कॉर्पिओ चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा:
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश सोहनी हा त्याच्या कारने शनिवारी सकाळी मुंबईहून पुण्याला चालला होता. सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास उर्से टोल नाक्याच्या पुढे काही अंतरावर असलेल्या सोमाटणे एक्झिट जवळ मागून काळ्या काचा असलेली एक सफेद रंगाची स्कॉर्पिओ आली. स्कॉर्पिओ चालकाने सोहनी यांना हात दखावून थांबण्यास सांगितले. त्यामुळे सोहनी यांच्या ड्रायव्हरने त्यांची कार थांबवली. स्कॉर्पिओ मधील एका व्यक्तीने ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यात एकजण जखमी झाला आहे. सदर अपघाताची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर तू मला सव्वा लाख रुपये दे, नाही तर तुझ्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करेन, असं धमकावत योगेश सोहनी याला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर सदर स्कॉर्पिओ चालकाने योगेश सोहनी यांना सोमाटणे फाटा येथील एका एटीएम मधून ५० हजार रुपये जबरदस्तीने काढण्यास लावले व ती रक्कम जबरदस्तीने घेऊन स्कॉर्पिओ चालकाने तेथून धूम ठोकली.
वाचा:
स्कॉर्पिओ चालकाने पैसे मिळताच धूम ठोकल्याने योगेश सोहनीला त्याच्याबद्दल संशय आला. त्यानं अपघाताबाबत माहिती घेतली असता, एक्सप्रेस वेवर कोणताही अपघात झाला नसल्याचे समजले. त्यानंतर योगेश सोहनी यानं सोमवारी पोलीस ठाण्यात जबरी चोरी व लुटमारीची तक्रार दाखल केली आहे. एक्सप्रेस वेवर असलेल्या सीसीटीव्ही फूटेजची पहाणी करून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. या प्रकरणी पुढील तपास शिरगाव पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण हे करीत आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times