पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन विभागाने (रानडे इन्स्टिट्यूट) ‘नोइंग आरएसएस’ या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयात जाण्याच्या सूचना दिल्याने युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेससह इतर संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. या आक्षेपानंतर ही कार्यशाळा रद्द करण्यात आली.

विश्व संवाद केंद्राने पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘नोइंग आरएसएस’ या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना पाठविण्याची विनंती विभागाला केली होती. त्याअनुषंगाने ‘एमजेएमसी’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात आली; तसेच अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये विचारधारेशी संबंधित उपक्रम असल्याने तो चौकटीत आहे. त्यामुळे या कार्यशाळेचा वेळापत्रकात समावेश करण्यात आला आहे. ही कार्यशाळा संघाच्या मोतीबाग कार्यशाळेत येत्या १५ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होईल. या कार्यशाळेत संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सूचना फलकावरील प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली होती. विभागाने या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना जाण्याच्या सूचना केल्याने युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर कार्यशाळा रद्द करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. विभागाने या कार्यशाळेचे आयोजन केलेले नसून, कोणत्याही विद्यार्थ्याला कार्यशाळेत जाण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. सुधारित निर्णयाप्रमाणे विद्यार्थ्यांना नव्या सूचना देण्यात येतील, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. उज्वला बर्वे यांनी दिली.

यापुढे विभागातच व्याख्यान

एमजेएमसीच्या अभ्यासक्रमातील वर्ल्ड व्ह्यू विषयामध्ये विद्यार्थ्यांना विविध विचारप्रवाहांची माहिती व्हावी व त्यांना सभोवतालचे योग्यप्रकारे आकलन व्हावे, हा हेतूने विविध संघटनांची ओळख करून दिली जाते. या विषयात सर्वच विचारधारा व संघटनाच्या परिचयाचा समावेश आहे. त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी नोईग आरएसएस या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते. ते शनिवार पेठेत मोतीबाग येथे होणार होते. मात्र, याला काही संघटनांनी विरोध दर्शवल्याने ही कार्याशाळा रद्द करण्यात आली आहे. यापुढे विविध संघटनांची माहिती देणारी लेक्चर्स विभागातच होतील, असा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

सुप्रिया सुळे यांनीही घेतला होता आक्षेप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेमकं काय सुरु आहे?, असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकारावर ट्विटरच्या माध्यमातून तीव्र आक्षेप घेतला होता. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला पाठविण्याची आयडीया कुणाची? संज्ञापन आणि वृत्तपत्र विभागात खास नोटीस काढून, वेळापत्रकात संघाशी संबंधित कार्यक्रम जाणीवपूर्वक लावला. कुलगुरुंचीही याला संमती आहे का?, अशी विचारणाही सुळे यांनी केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here