जळगाव जिल्ह्यातील रावेर जवळील पाल वनक्षेत्रात येथील पोलिस ठाण्याची पोलीस व्हॅन (क्र एम एच १९- एम- ०६८१) नेहमी प्रमाणे रात्री पाल येथे गस्त घालण्यासाठी गेली होती. गाडीत पोलीस कर्मचारी श्रीराम कांगणे आणि गृहरक्षक दलाचे सुनिल तडवी, कांतीलाल तायडे आणि अमित समर्थ होते. परत येताना पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी सहस्त्रलिंग गावानजीकच्या सलीम तडवी यांच्या ढाब्याजवळ हे चौघे चहा पिण्यासाठी थांबले असता रावेरकडून त्यांना दोन मोटारसायकली येताना दिसल्या. इतक्या मध्यरात्री कोण आहे हे पाहण्यासाठी पोलिस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी त्यांना थांबविण्याच्या प्रयत्न केला मात्र पहिली मोटरसायकल वेगात पालकडे निघून गेली. मात्र दुसऱ्या मोटारसायकल स्वाराने पोलिसांना पाहताच मोटर सायकल थांबवली, मागील व्यक्तीने पोलिसांच्या आणि गाडीच्या दिशेने गोळीबार केला आणि तातडीने आल्या रस्त्याने मोटारसायकल निघून गेली. चौघांनी त्यांचा पाठलाग केला. पण अंधाराचा आणि जंगलाचा फायदा घेऊन ते पसार झाले.
घटनेची खबर मिळतात घटनास्थळी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, विभागाचे पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे आणि पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी भेट दिली आणि पाहणी केली. पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बशीर शेख यावेळी उपस्थित होते. घटनास्थळी श्वानपथक आणि तसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
ठासणीच्या बंदुकीचा वापर
दोघा अज्ञातांनी ठासणीच्या बंदुकीतून गोळीबार केला. त्यात दारू भरून तिचा बार उडवला जातो. जर त्यांच्याजवळील बंदूक गोळ्यांची असती तर त्यांना दुसरी गोळी झाडता आली असती आणि अनर्थ ओढवला असता. पळून जाताना ही गावठी बंदूक त्यांच्या हातून खाली पडली आणि ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या बंदुकीचा वापर करून हे चौघे शिकार करण्यासाठी आल्याचा संशय आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times