दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची अनेक कारणे सांगितली जात आहेत. मात्र, अमित शहा यांनी भाजपच्या नुकसानीला वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना जबाबदार धरलं आहे. निवडणूक प्रचारावेळी भाजप नेता अनुराग ठाकूर यांनी ‘देश के गद्दारों…’ असं विधान करून वाद निर्माण केला होता. टाइम्स नाऊ समिटमध्ये यासंबंधी प्रश्न विचारला असता, ‘अशी वक्तव्ये करायला नको होती. अशा वक्तव्यांमुळं पक्षाचं नुकसान झालं असावं,’ असं शहा म्हणाले. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचाही उल्लेख केला. भाजप नेत्यांची वक्तव्ये ज्या पद्धतीनं दाखवण्यात आली, तसं राहुल गांधींबाबत झालं नाही, असंही ते म्हणाले.
अमित शहा यांनी दिल्ली निवडणुकीमध्ये अनेक सभा आणि रोड शो केले होते. निकालानंतर त्यांनी पराभवही मान्य केला होता. अलीकडेच मोदींचा बहुमतानं विजयी झाले आहेत. काही राज्यांत यश मिळालं नाही. पण भाजपवरील लोकांचा विश्वास उडाला आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. महाराष्ट्रात आम्ही निवडणुका जिंकलो आहोत. हरयाणात फक्त सहा जागा कमी झाल्या आहेत. झारखंडमध्ये आम्ही निवडणुका हरलो. दिल्लीत जागा आणि मतांची टक्केवारी वाढली आहे, असं शहा म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times