पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तुलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे.
भरदिवसा घडलेल्या प्रकाराने शहरात खळबळ
पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही काळात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र आज थेट लोकप्रतिनिधीवरच गोळीबार करण्यात आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र नेमक्या कोणत्या कारणातून हा गोळीबार करण्यात आला, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.
याप्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून या तपासानंतरच गोळीबारामागील नेमकं कारण कळू शकणार आहे.
कोण आहेत आमदार अण्णा बनसोडे?
राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडे हे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. अण्णा बनसोडे यांनी 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला होता. अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times