मुंबई: सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम उद्या १४ फेब्रुवारीपासून हाती घेण्यात येत असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आठवड्यातून केवळ चार दिवस बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. तसे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

‘आठवड्यातून चार दिवस बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येईल. यादरम्यान पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर केले असून त्यातील पहिला ब्लॉक १४ फेब्रुवारी सकाळी पाच ते १७ फेब्रुवारी सकाळी पाच वाजेपर्यंत असेल’, असे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले.

सायन उड्डाणपुलाच्या कामाबाबत नुकतीच वाहतूक विभाग आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत वाहतुकीवर अधिक परिणाम होऊ न देता पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार १४ फेब्रुवारीपासून ६ एप्रिलपर्यंत प्रत्येक आठवड्यात गुरुवारी सकाळी पाच ते सोमवार पहाटे पाच वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. ६ एप्रिलनंतर सलग २० दिवस पुलावरील वाहतूक पूर्ण बंद राहणार असून एप्रिल अखेरपर्यंत उड्डाणपुलाची डागडुजी पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, सायनच्या उड्डाणपुलावरील वाहतूक बंद असेल त्यादिवशी सायन सर्कल येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांची जादा कुमक तैनात ठेवण्यात येणार आहे.

आयआयटीच्या टीमने केली होती तपासणी

सायन उड्डाणपुलाची तपासणी केल्यानंतर आयआयटी मुंबईच्या टीमने १७० बेअरिंग बदलण्यास सांगितले होते. आयआयटीने केलेल्या सूचनेनुसार डिसेंबर २०१८ पासूनच पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी अनेक मुहूर्त ठरले मात्र काही ना काही कारणाने हे काम पुढे ढकलावे लागले होते. आता सर्व अडथळे दूर होऊन हे काम उद्यापासून सुरू होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here