बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत आहेत. सध्याचे दिवस उपवास करण्याचे नसून अंडी आणि मटन खा, असं आवाहन केल्याने आता पुन्हा एकदा ते वादात सापडले आहेत. वारकरी संप्रदायासह भाजपकडून संजय गायकवाड यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे.

“मी केलेल्या वक्तव्यानंतर काही लोकांनी ‘ध’ चा ‘मा’ करुन आपल्या अंगावर ओढायचा जो काही प्रयत्न सुरू केला आहे, तो एका विशिष्ट पक्षाशी संबंधित असलेल्या सेलच्या लोकांनी सुरू केला आहे. मी कुठल्याही संप्रदायावर, कुठल्याही धर्मावर, कुठल्याही पंथावर विधान केलेलं नाही. जे लोक मी मरताना पाहतोय ते घडताना जे काळीज फाटतंय…त्या महिलांचा तो आक्रोश पाहावला जात नाही, ते पाहून मला असं वाटलं काही करून हे जीव वाचले पाहिजे म्हणून त्यातला साधा एक उपाय सांगण्याचा प्रयत्न केला आणि जे काही मी विधान केलं ते कोणाच्या विरोधात न केल्यामुळे त्यावर मी आजही ठाम आहे,’ अशी भूमिका संजय गायवाड यांनी घेतली आहे.

नेमकं काय म्हणाले होते संजय गायकवाड?
बुलडाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एका नवीन विधानाने चर्चेत आले आहेत. त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. ” उपवास करण्याची ही वेळ नाही, अंडी-मटन खा, कोरोनात देवही वाचवायला येणार नाही,” असं आवाहन त्यांच्या समर्थकांना गायकवाड यांनी एका वृत्तपत्राच्या माध्यमातून केलं होतं.

आमदार संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यावर बुलडाणा जिल्ह्यातून आणि राज्यभरातून आक्षेप घेतला गेला. या वादावर आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “काल मी माझ्या समर्थकांना, माझ्या चाहत्यांना जे करोनाशी झुंज देत आहे त्यांचा जीव वाचावा म्हणून त्यांना सांगितले की, त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता प्रोटीन म्हणजे किमान रोज अंडी खावीत किंवा एक दिवस चिकन-मटण खावं.”

“देशाचे पंतप्रधान बिर्याणी खातात”
‘देशाचे पंतप्रधान हे विदेशात गेल्यावर पाकिस्तानमध्ये बिर्याणी खातात. तेव्हा या लोकांनी म्हटलं का की धर्मभ्रष्ट झाला आहे म्हणून? आज मला हे असं सांगतात की तुम्ही असं बोलल्यामुळे हिंदू धर्माची भावना दुखावली गेली. आज ७० ते ८० टक्के लोक रूटीनमध्ये नॉनव्हेज खातात, त्यांचा कुठला धर्म भ्रष्ट झाला किंवा तुम्ही कुठे त्यांना धर्माच्या बाहेर करणार आहे?’ असा सवालही आमदार गायकवाड यांनी विचारला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here