म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी ( ) भूसंपादन कराव्या लागणाऱ्या पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील १४७० हेक्टर जमिनीपैकी पुणे जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मांजरी येथील सुमारे एक हेक्टर जमीन ही थेट खरेदीने ताब्यात घेण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांतील सुमारे ५७५ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. त्यापैकी हवेलीतील मांजरी येथील जमीन ताब्यात घेण्याबाबतची नोटीस उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी काढली आहे. संबंधितांना हरकती आणि सूचनांसाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ही जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ही जमीन थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मांजरीतील ६७ जणांची जमीन घ्यावी लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या जमिनी ताब्यात घेण्याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. भूसंपादनासाठी सुमारे १२०० ते १५०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here