प्रशासनाकडून आलेल्या चौकशीच्या नोटिसीला त्यांनी उत्तर दिले असून संबंधित पोस्टही मागे घेतली आहे. ‘यानंतरही कोणी असा उपचार केला, तर होणाऱ्या परिणामांना तुम्हीच जबाबदार राहाल,’ असा इशाराही त्यांनी नागरिकांना दिला आहे. तीन दिवसांपूर्वी डॉ. भिसे यांनी एक पोस्ट लिहून करोना रुग्णाला काही दिवस दररोज ६० मिलीलीटर देशी दारू पाजल्यास करोना लवकर बरा होता असा दावा केला होता. आपण हा प्रयोग ५० रुग्णांवर केल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. आरोग्य विभाग आणि प्रशासनानेही याची दखल घेऊन डॉ. भिसे यांना नोटीस पाठविली. या नोटिशीला डॉ. भिसे यांनी उत्तर दिले आहे.
डॉ. भिसे यांनी म्हटले आहे की, ‘देशी दारूमुळे करोना बरा होतो, असा दावा आपण केलेला नाही. नेहमीची ॲलोपॅथिक औषधे आणि प्रमाणित मात्रेत अल्कोहोल सेवन केल्यास करोना रुग्ण बरा होतो, असा अनुभव सांगितला आहे. या आजाराबाबत आपण कोणाचीही दिशाभूल केलेली नाही. मात्र, श्वसन संस्थेच्या आजारावर अल्कोहोल उपयुक्त ठरते, याला आयुर्वेदात शास्त्रीय आधार आहे. सरकारने करोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे आणि सुचनांचे संपूर्ण पालन करत आहे. जोपर्यंत शास्त्रीय कसोट्यावर टास्क फोर्स हा विषय पडताळून पहात नाही, तोपर्यंत माझे अनुभव मी सार्वजनिक माध्यमातून काढुन टाकत आहे. हे अनुभव माध्यमावर टाकण्याचा माझा हेतू निर्मळ आणि शुद्ध होता. माझे शास्त्रीय अनुभव वरिष्ठ तज्ञ समिती समोर मांडण्यास मला समती द्यावी,’ असेही डॉ. भिसे यांनी उत्तरात म्हटले आहे.
त्यानंतर भिसे यांनी सोशल मीडियातील आपली मूळ पोस्ट काढून टाकली असून आणखी एक नवी पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘आपण सर्वांना सांगू इच्छीतो की मी फक्त देशी दारूने करोना बरा होतो, असा दावा केलेला नाही. ज्या रुग्णांवर मी हा प्रयोग केला, त्यांच्यावर सरकारने प्रमाणित करून दिलेले उपचारही सुरू ठेवले होते. करोनावर उपचार म्हणून अल्कोहोलचा वापर करण्यास तज्ज्ञांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे कोणीही आपल्या रुग्णाला माझ्या त्या पोस्टप्रमाणे अल्कोहोल देऊ नये. त्यासाठी कोविड टास्क फोर्सची परवानगी आवश्यक आहे. ती मिळविण्यासाठी मी प्रयत्न करीन. माझ्या त्या पोस्टचा गैरअर्थ काढून कोणी अपप्रचार करून व्यसनाचे किंवा दारूचे समर्थन करू नये. डॉक्टरांचा सल्ला न घेता चुकीचा उपचार स्वत:च्या मनाने केला तर होणाऱ्या परिणामाला तुम्ही स्वत: जबाबदार असाल, याची नोंद घ्यावी,’ असेही डॉ. भिसे यांनी म्हटले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times