या प्रकरणी, प्रकाश सिद्धेश्वर व्हटकर (नायब तहसीलदार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून गौरी गुरुंग, सविता उर्फ करिश्मा लष्करे, कायाकल्प संस्थेचे अन्य काही सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासन निर्णयाप्रमाणे देह विक्री करणाऱ्या महिलांची करोना काळात उपासमार होऊ नये यासाठी, त्यांची कोणतीही ओळखपत्र न घेता अनुदान वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या महिलांची यादी बनविण्याचे काम कायाकल्प संस्थेला देण्यात आले आहे. आरोपी हे या संस्थेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी संगनमत करून कट रचला आणि गोरगरीब, कष्टकरी महिलांना तीन महिन्याकरीता प्रत्येकी पाच हजार त्यांचे कायाकल्प संस्थेकडून मिळणार असलयाची बतावणी केली.
या महिलांची राज्य सरकारच्या देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आर्थिक मदत योजनेत त्यांची नोंदणी केली. त्यांनतर राज्य सरकारकडून काही महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. एका महिन्याचे पाच हजार, याप्रमाणे तीन महिन्याचे १५ हजार रुपये त्यांना देण्यात आले. मात्र, आरोपींनी त्या महिलांकडून त्यातील १० हजार रुपये घेऊन स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेतला आहे. त्यामुळे सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात भारतीय जनता पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, शहरात या योजनेत अशा प्रकारे गैरप्रकार झाला असून, कारवाईची मागणी केली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times