गडचिरोली : लोक पद टिकवण्यासाठी काय-काय करतील याचा नेम नाही. गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या कनेरी या ग्रामपंचायतीमधील उपसरपंचाने अतिक्रमणामुळे ग्रामपंचायतचे सदस्यत्व रद्द होण्यापासून वाचवण्याकरिता असा काही प्रकार केला की वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

मिळालेल्या माहितीनुसार, सदस्यत्व टिकवण्यासाठी आपण बायकोपासून 1995-96 पासून विभक्त झालो असून बायकोने केलेल्या अतिक्रमणाशी माझा काही संबंध नाही. सबब या प्रकरणी सदस्यत्व रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही. असा बचावात्मक युक्तिवाद करण्यात आला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी असा तर्क मानण्यास नकार देत सदर सदस्य हे पत्नीपासून विभक्त असल्याचे कोणतेही सबळ पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे पत्नीचे अतिक्रमण ग्राह्य मानुन, त्यांना ग्रामपंचायतचे सदस्यत्वापासून अनर्ह केले आहे.

प्रभाकर विष्‍णु लाकडे असं त्यांचे नाव असून सदर उपसरपंच हे शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असल्यामुळे फक्त पद टिकवण्यासाठी बायकोसोबत संबंध तोडण्याचे कारण देण्यावर घोर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एवढेच नव्हे तर ते गावात टीकेचा विषय ठरले आहेत. या सोबतच कनेरी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य चंद्रभागा कुमरे यांनासुद्धा अतिक्रमण केल्याप्रकरणी सदस्यत्वातून दूर केले आहे.

जानेवारी 2021 मध्ये ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात प्रभाकर लाकडे हे कनेरी ग्रापं येथील प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आले. बहुमत असल्याने पुढे ते उपसरपंचही झाले. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य अजय संजय गेडाम यांनी प्रभाकर लाकडे यांनी आपल्या पत्नीच्या नावाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करणारी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

यावर सुनावणी होऊन 12 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केला. त्यानुसार प्रभाकर लाकडे यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. अजय गेडाम यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गैरअर्जदार प्रभाकर लाकडे यांना लेखी उत्तर देण्यास सांगितले. त्यात लाकडे यांनी अजबच माहिती दिली. ‘मी 1984 पासून जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षक होतो. ऑगस्ट 2019 मध्ये सेवानिवृत्त झालो. त्यानंतर मी कनेरी येथील वडिलोपार्जित घरी वास्तव्यास आलो. माझ्या पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांकडून प्राप्त रकमेच्या बळावर भूमापन क्रमांक 43 वर घर बांधले. परंतु 1995-96 पासून माझी पत्नी माझ्यापासून विभक्त राहत आहे व मी पत्नीसोबत अतिक्रमित जागेवर बांधलेल्या घरात कधीही वास्तव्यास नव्हतो. त्यामुळे माझे सदस्यत्व कायम ठेवावे, असा अजब युक्तिवाद लाकडे यांनी केला.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी व तलाठ्याकडून अहवाल मागितला. दोघांच्या संयुक्त अहवालानुसार, तसेच तहसीलदारांच्या अहवालानुसार, प्रभाकर लाकडे हे आपल्या पत्नीसह अतिक्रमण केलेल्या जागेवर एकत्रित राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभाकर लाकडे यांचे सदस्यत्व रद्द केले.

पद वाचवण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूलचा मुख्याध्यापक राहिलेल्या एका व्यक्तीने चक्क पत्नीपासून विभक्त राहत असल्याचे खोटे कारण सांगितल्यामुळे ‘शिक्षक तुम्ही सुद्धा’ अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here