: नागपूरमध्ये कैद्याकडे खंडणीची मागणी करणाऱ्या तीन जेलरविरुद्ध धंतोली पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. कृष्णा चौधरी (वय ४३), गुलाब खरडे (वय ५५) आणि रवींद्र पारेकर (वय ४५), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जेलरची नावे आहेत.

चौधरी हे सध्या नाशिक कारागृहात तर खरडे अमरावती व पारेकर हे पुण्यातील कारागृह प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहेत. मदनकुमार बाबूलाल श्रीवास (वय ६२ रा. हिंगणघाट) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाच्या गुन्ह्यात मदन याला जन्मठेपेची शिक्षा झाली.

२०१४ मध्ये त्याला नागपूर कारागृहातील बडी गोल येथे ठेवण्यात आले. सप्टेंबर २०१४ ते एप्रिल २०१५ या कालावधीत तीन जेलरांनी त्याला एक लाख आठ हजार रुपयांची खंडणी मागितली. तसंच खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, मदनकुमार याची जामिनावर सुटका झाली. त्याने जेलरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला. उच्च न्यायालयाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देत अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यानंतर धंतोली पोलिसांनी तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, तिघांविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येऊन त्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here