मुंबईः महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेतील कुरुबुरी अनेकदा समोर आल्या आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात शिवसेनेकडून होत असलेल्या लसीकरण केंद्राच्या उद्धाटनावरुन काँग्रेस आमदार यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत. ‘शिवसेनेकडून वांद्रे पूर्व येथे आयोजित भव्य लसीकरण महोत्सवात तुमचं स्वागत. याठिकाणी लसींपेक्षांही जास्त बॅनर्स तुम्हाला दिसून येतील. येथील बॅनरवर महाविकास आघाडीचा उल्लेख कुठेच दिसत नाही. म्हणजे, इथं आणल्या जाणाऱ्या लसी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वखर्चातून पक्षनिधीतून आणल्या जात आहेत का? कृपया लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचा सोहळा करणं थांबवा, हे आपलं कर्तव्यच आहे,’ असं म्हणत झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेला फटकारलं आहे. सिद्दीकी यांनी लसीकरण केंद्रावरील पोस्टर्स आणि बॅनर्सचे फोटोही शेअर केले आहेत.

झिशान यांनी याआधीही एक ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. ‘महाराष्ट्रात कलम १४४ लागू आहे. पण नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्ते लसीकरण केंद्रांच्या उद्घटनासाठी गर्दी करु शकतात. नियं फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत का? शिवसेनेला हे नियम लागू नाहीत का?, इथं एक व्यक्ती लस घेत असताना बारा जण फोटो काढतात,’ असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, यापूर्वीही लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरुन झिशान सिद्दीकी यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. ‘वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मी स्थानिक आमदार असूनसुद्धा प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. मला या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हतं. आपण लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण करणार आहात का?,’ असा थेट सवाल त्यांनी केला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here