म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
लशींच्या कमतरतेमुळे एकीकडे लसीकरणाचा बोजवारा उडाला असताना मुंबई महापालिकेने ९० दिवसात संपूर्ण मुंबईचे लसीकरण करण्याचा निर्धार केला आहे. हे शक्य नसल्याचा सूर राजकीय, सामाजिक क्षेत्रातून उमटत असताना पालिकेने हे शक्य असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. सरकार, पालिका, खासगी रुग्णालये, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ‘सर्व क्षेत्रांसाठी’ लसीकरण खुले करून ही मोहीम यशस्वी करता येईल, अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

लसीकरण वेगाने करून मुंबईतील करोना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने एक कोटी लसमात्रांसाठी जागतिक निविदा मागवल्या आहेत. येत्या काही दिवसांत या निविदा मंजूर होऊन प्रत्यक्ष लसीकरणाला सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईत मार्चपासून लसीकरण सुरू होऊन आत्तापर्यंत फक्त २५ लाखांहून अधिक लसीकरण करणे शक्य झाले आहे. लाखो ज्येष्ठ नागरिकांना लशीचा दुसरा डोस मिळण्यात अडथळे येत आहेत. १८ ते ४४ वयोगटाचा घोळ सुरू असताना सव्वा कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या आडव्या-उभ्या मुंबईत इतके वेगवान लसीकरण शक्य आहे का, पालिका तसेच खासगी रुग्णालयात तितक्या पायाभूत सुविधा आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी लस वेळेत मिळाल्यास ही मोहीम यशस्वी करता येऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘दोन प्रकारांत हे लसीकरण करून घेतले जाणार असून, पहिल्या प्रकारात पालिका आणि सरकारी कार्यालये, रुग्णालये, दवाखाने, तसेच मुंबईतील प्रत्येक विभागात एक याप्रमाणे पालिकेची २२७ लसीकरण केंद्रांवर लस मिळेल. त्यासाठी इच्छुक असलेल्या सामाजिक, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. तज्ज्ञांकडून लस टोचून घेणे, आपल्या केंद्रांतील पायाभूत सुविधा, नागरिकांची कोविन अॅपवरील नोंदणी या संस्थांनीच करायची आहे. या संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेचे डॉक्टर उपलब्ध असतील. लशीचा नियमित आणि वेळेत पुरवठा झाल्यास २४ तास लसीकरण केंद्र सुरू ठेवली जाणार आहेत’, असे काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसऱ्या प्रकारात खासगीकरणाद्वारे लसीकरण केले जाईल.

खासगी रुग्णालयांद्वारे मोहीम

‘दुसऱ्या प्रकारात अधिकाधिक खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली जाईल. गृहनिर्माण सोसायट्या, कंपन्या, औद्योगिक वसाहती, कॉर्पोरेट सेक्टरमधील कंपन्या यांना लसीकरणाची परवानगी दिली जाईल. त्यांनी खासगी रुग्णालयांशी समन्वय साधून लसीकरण करून घ्यायचे आहे. सरकारने ठरवलेल्या शुल्कात ही लस दिली जाणार असून पालिकेची लस मोफत असणार आहे’, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here