अमरावतीः खंडेश्वर तालुक्यातील महिला सुनंदा रामभाऊ ठाकरे यांच्या शेतातून गौण खनिज माती व मुरूम औरंगाबाद येथील एका कंपनीच्या कंत्राटदाराने चोरून नेल्याची तक्रार महिला शेतकऱ्याने तहसीलदार किशोर यादव यांच्याकडे केली होती. या प्रकरणी तहसीलदारांनी संबंधित कंपनीसह कंत्राटदाराला एकूण २५ कोटी ६६ लाख ६७ हजार २०४ रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तालुक्यातून समृद्धी महामार्ग गेला असून त्या कामाचे कंत्राट हैदराबाद येथील एनसीसी लि. कंपनीकडे असून त्या अंतर्गत औरंगाबाद येथील कंत्राटदार हे काम पहात आहे. दरम्यान या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची आवश्यकता आहे. त्यासाठी कोणतीही परवानगी न घेता संबंधित कंत्राटदार परिसरात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करीत आहे.

दरम्यान, कंत्राटदाराने खेड पिंपरी येथील शेतकरी सुष्मा ठाकरे व नितीन ठाकरे या बहिण भावासोबत त्यांच्या शेतातून गौण खनिज घेण्यासाठी करार केला. त्यापोटी २८ लाख ६ हजार रुपये धनादेशाद्वारे सुष्मा ठाकरे, तर ७ लाख ५० हजार नितीन ठाकरे यांना देण्यात आले. मात्र कंत्राटदाराने सुषमा ठाकरे यांच्या शेतातून गौण खनिजाची उचल न करता त्यांच्या शेताला लागून असलेली त्यांच्या बहिणी सुनंदा ठाकरे यांच्या शेतातून गौण खजिनाची उचल केली. त्यासाठी १० ते १५ फुटांपर्यंत अवैधरित्या उत्खनन केले. या संदर्भात सुनंदा ठाकरे यांनी नांदगावच्या तहसीलदारांकडे तक्रार केली.

तक्रारीच्या अनुषंगाने बडनेरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा अहवाल घेण्यात आला. त्यामध्ये प्रत्यक्ष उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी यांचा अहवाल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेशानुसार एनसीसी कंपी व कंत्राटदार कुमारसिंग यांना २५ कोटी ६६ लाख ६७ हजार २०४ रुपयांचा दंड ठोठावला असून दंडाची रक्कम ३० दिवसांच्या आत भरण्याचे निर्देश दिले, असल्याची माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here