मुंबई : अरबी समुद्रात (Arabian sea) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तौत्के चक्रीवादळाचा () धोका निर्माण झाला आहे. आता हे चक्रीवादळ केरळच्या दिशेने सरकलं असलं तरी अनेक राज्यांना आणि शहरांना या वादळाचा धोका असणार आहे. मुंबईतही (Mumbai)या चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडण्याआधी हवामानाचा अंदाज नक्की घ्या.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतील तर यावेळी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी महत्त्वाचं काम नसल्यास घराबाहेर जाणं टाळावं. मुंबईसह अनेक उपनगरांत आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

मुंबईत अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून वातावरणात गारवा आहे. यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत पहाटेच्या सुमारास दक्षिण मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. आज दिवसभर वातावरण असंच राहणार असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
लक्षद्वीपजवळ अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) तयार झाले असून, शनिवारी त्याचे तौत्के चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. हे चक्रीवादळ अतितीव्र स्वरूपात १७ मेच्या मध्यरात्री गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे १५ ते १७ मेदरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मोठ्या पावसाचा इशाराही आयएमडीने दिला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तौत्के चक्रीवादळ तयार होऊन पुढील २४ तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तर-वायव्येकडे सरकणार असून, १७ मे रोजी रात्री ९ ते १२च्या दरम्यान ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहचण्याचा अंदाज आहे. गुजरातजवळ अतितीव्र स्वरूपात असणाऱ्या चक्रीवादळाच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी १६० किलोमीटरपर्यंत पोहचू शकतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here