करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कितीही निर्बंध घातले तरी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे या जीवघेण्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नागरिकांची यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी किराणा, भाजीपाला आणि इतर महत्वाच्या वस्तूंचा घरपोच पुरवठा केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी घरपोच देण्यात येणार असून नागरिकांनी मात्र बाहेर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आदेशानुसार, सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पीठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने, सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार घरपोच सेवा सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत. रेशन दुकानेही सकाळी सात ते दुपारी 3 सुरु राहतील. त्यासाठी तहसीलदार व स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांचे व्हाटसअप ग्रुप तयार करून टोकन सिस्टीमचा अवलंब करण्याचे निर्देश आहेत.
हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेलमध्ये स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. तिथे ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस ठाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण सकाळी 7 ते सकाळी 12 दरम्यान करता येईल.
लग्नाला फक्त १५ जणांची परवानगी
सर्व स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्याचे आदेश आहेत. लग्नामध्ये मिरवणूक, जेवणावळी, वाजंत्री पथक यांना परवानगी नाही. लग्नाला केवळ 15 व्यक्ती उपस्थित राहू शकतील व लग्नसोहळा 2 तासांत आटोपणे आवश्यक आहे. बेकायदेशीरपणे लग्नसोहळा पार पडल्यास कारवाई होईल.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times