यवतमाळ : करोनाबाधित बालकांना तसेच कोविडचे प्रतिपिंड तयार झालेल्या बालकांमध्ये मल्टिसिस्टम इन्फ्लोमेटरी सिंड्रोम म्हणजेच पोस्ट कोविड (एमआयएससी) या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे येथील बालरोग तज्ज्ञ तथा आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी यांनी सांगितले आहे.

बालकांसाठी विदर्भातील पहिले कोविड रुग्णालय सुरू केल्यानंतर त्यांच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्यां बालकांमध्ये या आजाराची लक्षणे असलेली सहा बालके आतापर्यंत आढळून आली आहेत. योग्य निदान होऊन वेळेत उपचार झाल्यास या आजारातून लवकर बाहेर पडता येते. मात्र, विलंब झाल्यास रुग्णाची प्रकृती गंभीर होण्याची धोका आहे.

करोनाच्या दुसऱ्यां लाटेत वयोवृद्धांपेक्षा बाधित होणाऱ्यां तरूणांची संख्या लक्षणीय आहे. तर आता राष्ट्रीय पातळीवर सरकारी यंत्रणेसह विविध वैद्यकीय अहवालानुसार, करोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने शासन, प्रशासन बालकांवरील उपचाराचे नियोजन करीत असताना यवतमाळात एमआयएससी-पोस्ट कोविड आजाराची लक्षणे असलेली बालके आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे.

या आजारात करोना संसर्गातून बरे झाल्यानंतर बालकांमध्ये शरीरातील विविध अवयवांवर सूज येऊन हात-पायाची हाडे, डोळे या अवयवांसह हृदयावर दुष्परिणाम होत असल्याचे आढळले. हृदयावर सूज येऊन, हृदयात, शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणे, अशी लक्षणे आढळतात.

बालकांची आई करोनाबाधित होऊन गेल्यानंतर करोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या पण शरीरात कोविडची प्रतिपिंड तयार झालेल्या बालकांमध्ये हा आजार बळावत असल्याचे दिसून आल्याचे डॉ. संजीव जोशी यांनी सांगितले.

या आजारावरील उपचार महागडे असल्याने पालकांनी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. वय आणि वजनानुसार बालरुग्णांवर आयव्ही-आयजी (इंन्टौव्हिनस इम्युनोग्लोब्युलीन) चे उपचार केले जातात, असे त्या म्हणाले. या आजाराची लक्षणे साधारणपणे दिसून येत नाही. त्यामुळे बालरुग्ण हाताळणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जात असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

बालकांना किंवा घरात पालकांना करोना होऊन गेला असल्यास या वयोगटातील बालकांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. वेळीच निदान व योग्य उपचार झाल्यास हा आजार घाबरण्यासारखा नसल्याने त्यामुळे पालकांनी लहान बालकांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here