‘राज्यात प्रस्थापित आणि विस्थापित असे मराठा समाजात दोन गट आहेत. यातील प्रस्थापित राजकारण्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. अनेक वर्षे राज्यात प्रस्थापित मराठा नेत्यांची सत्ता आहे, त्यांनी कधीच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. उलट सारथी संस्था कोणी बंद पाडली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राज्य नियोजन मंडळात विलीन करण्याचे कारण काय?’ असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
‘ते सारे चोरांच्या आळंदीला जाणारी नेते आहेत…’; नक्की काय म्हणाले सदाभाऊ खोत?
‘मराठा आरक्षणसंबंधी महाविकास आघाडी सरकार पहिल्यापासून बेफिकीर आहे. वास्तविक सरकारने वकिलांची फौज नेमून कायदेशीर बाजू भक्कमपणे मांडायला हवी होती. पण तसे झाले नाही. उलट मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यपाल आरक्षण देणार नाहीत, हे त्यांना माहीत आहे. तरीही ते राज्यपालांना भेटतात. त्यांना देवाच्या आळंदीला जायचेच नाही, ते सारे चोरांच्या आळंदीला जाणारी नेते आहेत. अनेक जण मराठा समाजाचे नाव घेऊन सरदारकी भोगत आहेत, हे सरदारच मराठा आरक्षणातील अडसर आहेत. त्यांना पायउतार करावेच लागेल. जोपर्यंत ते पायउतार होणार नाहीत, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणे कठीण आहे,’ असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर खोत यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, चव्हाण यांना आदर्श कारभारामुळे घरी जावे लागले होते . दोन वर्षे ते मराठा आरक्षणाचे ज्या पद्धतीने काम करत होते ते काम पाहता अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होते का अशी शंका येते. त्यांना आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर ते ज्या पद्धतीने टीका करत आहेत, ते पाहता काम न करणाऱ्या या निष्क्रिय नेत्याला आता उपसमितीचे अध्यक्ष पद देणे चुकीचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून ते तातडीने काढून घ्यावे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times