अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरातील रहिवासी श्री प्रकाश व सौ. पुष्पा गुल्हाणे यांचा एकुलता एक मुलगा संदेश गुल्हाणे यांचा जन्म लंडनमध्येच झाला. व्यवसायाने डॉक्टर असलेले संदेश गुल्हाणे यांनी पूर्व किल्ब्राईडमधील रुग्णालयात ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम केले.
वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी विविध क्षेत्रात कार्य करत स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. २०२१ मध्ये डॉ. संदेश यांनी स्कॉटलंडच्या संसद निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह आणि युनियनवादी पार्टीकडून डॉ. संदेश खासदार म्हणून निवडून आले. स्कॉटलंड संसदेत निवडून गेलेल्या भारतीय वंशाचे ते पहिलेच व्यक्ती आहेत.
डॉ. संदेश गुल्हाणे यांनी कोविड फ्रंटलाइनवर काम केल्यानंतर होलीरूड निवडणुकीत टॉरीजसाठी उभे राहण्याचे ठरविले.
ग्लासगो आणि आसपासच्या भागात शस्त्रक्रियांमध्ये काम करणारे गुल्हाणे हे ग्लासगो क्षेत्राच्या टोरी यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर आहेत. ते एसएनपीचे न्याय सचिव हमजा यूसुफच्या विरोधातही पोलॉकमध्ये उभे होते.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील रहिवासी डॉ. संदेश गुल्हाणे यांचे मामेभाऊ महेश सुरंजे सांगतात की, ‘माझे मामा प्रकाश गुल्हाणे लंडन येथील एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. ८ तारखेला डॉ. संदेश गुल्हाणे स्कॉटिश पार्लामेंटमध्ये निवडून आल्याची माहिती मिळताच आमचा आनंद द्विगुणीत झाला. एक सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर संपादन केलेले यश जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times