चीनने २३ जुलै २०२० रोजी ‘त्यानवेन-१’ या मोहिमेत यान प्रक्षेपित केले होते. सात महिन्यांच्या अवकाशातील प्रवासानंतर फेब्रुवारीमध्ये हे यान मंगळाच्या कक्षेमध्ये पोहोचले होते. या मोहिमेमध्ये एक रोव्हर, एक लँडर आणि एका ऑर्बिटरचा समावेश आहे. कक्षेत प्रदक्षिणा आणि प्रत्यक्ष पृष्ठभागावरील संशोधन या दोन्ही पद्धतीने संशोधन करणार असून, चीनच्या पृष्ठभागावरील जीवसृष्टीचा अभ्यास हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. चीनचे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले असून, पूर्वी या भागात समुद्र किंवा सरोवर असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्याचाही प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून ‘झुरोंग’ हे रोव्हर उतरवण्यात आले आहे. मोहिमेत निश्चित केलेल्या ठिकाणी हे रोव्हर उतरले आहे, असे चीनच्या अवकाश संस्थेकडून सांगण्यात आले.
सहा चाकांच्या या रोव्हरचे वजन २४० किलो आहे. त्यावर सहा वैज्ञानिक उपकरणे असून, सौरउर्जेवर या रोव्हरचे काम चालेल. मंगळाच्या पृष्ठभागावर यान उतरवणे हे अतिशय कठीण काम असल्यामुळे, चीनने एक महत्त्वाचा पल्ला गाठल्याचे मानण्यात येत आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या अवकाश संस्थेचे अभिनंदन केले आहे.
स्पर्धा वाढण्याची शक्यता
मंगळावरील मोहिमांमध्ये अमेरिका सर्वांत आघाडीवर आहे. मंगळावर रोव्हर, लँडर उतरवण्यातमध्ये आतापर्यंत केवळ अमेरिकेलाच यश आलेले आहे. त्यांच्यापाठोपाठ आता चीनने हे यश मिळवले आहे. तीनच महिन्यांपूर्वी अमेरिकेचे ‘पर्सेव्हरन्स’ हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले होते आणि तेथे हेलिकॉप्टर उडवण्यातही अमेरिकेला यश आले आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया, युरोपीय महासंघ आणि भारताने मंगळावर यशस्वीपणे यान पाठवले आहे. त्यामुळे, या पुढील काळामध्ये मंगळावरील मोहिमांची स्पर्धा तीव्र होईल, असे मानण्यात येत आहे.
वाचा:
नऊ मिनिटांचा थरार
चीनचे यान शनिवारी त्याच्या कक्षेतून खाली येत मंगळापासून १२५ किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले. त्यानंतर रोव्हर आणि लँडर यानापासून विलग झाले आणि त्यांचा मंगळाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. या मोहिमेतील हा सर्वांत आव्हानात्मक टप्पा होता. हे यान १०० मीटर उंचीवर पोहोचल्यानंतर पृष्ठभागावर अडथळे असल्याचे लक्षात आले आणि तीव्र उतार असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे, तुलनेने सपाट पृष्ठभाग शोधून चार पायांवर हे रोव्हर सुरक्षितपणे उतरले. हा संपूर्ण थरार नऊ मिनिटांमध्ये घडला आणि या काळामध्ये नियंत्रण कक्षाशी संपर्क नव्हता, असे गेंग यान या अधिकाऱ्याने सांगितले. या संपूर्ण प्रवासात एखादी कृती चुकली असती, तरीही संपूर्ण मोहीम अयशस्वी ठरली असती, असेही त्यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times