मुंबईः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते या चक्रीवादळाचा मुंबई शहराला धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्यानं मुंबईत वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं सुरक्षेच्या दृष्टीनं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. चक्रीवादळाचा फटका हा लसीकरण मोहिमेलाही बसला आहे.

चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसला तरी पुढील खबरदारी म्हणून पालिकेनं सोमवारी लसीकरण मोहिम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्या, सोमवारी लसीकरण मोहीम होणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसंच, महापालिकेनं १८ मे ते २० मे या कालावधीत केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी निश्चित केलेला १२ ते १६ आठवडयाच्या कालावधीची अंमलबजावणी केली जाणार आहे.

त्यानुसार आरोग्य आणि फ्रंट लाइन कर्मचारी वगळता १ मार्च रोजी पहिला डोस घेतलेल्या अन्य कोणत्याही घटकांना दुसरा डोस दिला जाणार नाही. त्यामुळे नव्या नियमानुसार १८ ते २० मे कालावधीत पहिला डोस घेऊ इच्छिणाऱ्या ६० आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकाना लस दिली जाईल, असे मुंबई पालिकेने जाहीर केले आहे.

दरम्यान, वादळामुळं दहिसर, मुलुंड आणि बीकेसी कोविड सेंटरमधील तब्बल ५८१ रुग्णांचे विविध कोविड सेंटर व रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले आहे. दहिसर कोविड सेंटरमधील १८४ रुग्णांना गोरेगाव येथील नेस्को आणि अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात हलवण्यात येते आहे. बीकेसी कोविड सेंटरमधील २४३ रुग्णांना नेस्को, सेव्हन हिल आणि अन्य रुग्णालयात तर मुलुंडमधील १५४ रुग्णांना मिठागर, जकात नाका येथे नवीन कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here