: करोना नियमावलीचे उल्लंघन करत पुणे शहरातील बालाजीनगर ते कात्रज स्मशानभूमी या दरम्यान एका खून झालेल्या सराईताच्या अंत्यविधीला तब्बल १०० ते १२५ दुचाकींची रॅली काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १५० ते २०० जणांविरूद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका गुंडाच्या अत्यंविधीला करोनाच्या काळात एवढी गर्दी जमल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत उपनिरीक्षक हरिश्चंद्र केंजळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सिध्दार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषीकेश भगत, गणेश फाळके याच्यासह साथीदारांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधव हनुमंत वाघाटे या सराईताच्या अंत्यविधीला दुचाकी रॅली काढण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरात टोळक्याने शनिवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास सराईत माधव वाघाटे याचा खून केला होता. त्यानंतर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यामुळे १०० ते १२५ जणांनी दुचाकीवरून रॅली काढली.

टोळक्याने बालाजीनगर ते धनकवडी आणि कात्रज स्मशानभूमीपर्यंत विना परवानगी रॅली काढून शांततेचा भंग केला. करोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक आणि रॅली काढण्यास बंदी असतानाही, टोळक्याने रॅली काढल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here