शहरातील गणूवाडी परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय युवकाची शहरातील अर्जून नगर भागात राहणाऱ्या २२ वर्षीय युवतीसोबत दोन वर्षांपूर्वी फोनच्या मदतीने एकमेकांसोबत ओळख झाली. दोघांच्याही भेटी गाठी सुरू झाल्या. त्यामुळे त्यांच्यात प्रेम झाले. याच दरम्यान त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या काळात युवकाने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप युवतीने तक्रारीत केला आहे.
मागील काही दिवसांपासून युवतीने युवकाला लग्न करण्याबाबत विचारणा केली असता युवक टाळाटाळ करत होता. तसंच मागील काही दिवसांपासून युवतीचा मोबाइल क्रमांक सुद्धा त्याने ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळेच पीडित युवती ही चार ते पाच दिवसांपासून युवकाच्या घरी जाऊन त्याची विचारपूस करत आहे. मात्र तो १ मेपासून घरी आलेला नाही आणि आम्हालाही त्याच्याबाबत माहिती नाही, असे युवकाच्या कुटुंबीयांनी सांगितल्याचे युवतीने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी युवतीने रविवारी पोलीस ठाणे गाठत युवकाविरुद्ध तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन युवकाचा शोध सुरू केल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times